...तरीही कृषी अधिकारी फिरकलेच नाहीत

सचिन सातपुते
Wednesday, 22 July 2020

शेवगाव शहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधीत क्षेत्र असल्याने उपलब्ध झालेल्या खतवाटपासाठी कृषी दुकानदारांनी शहराबाहेर पावती देऊन वाटपाचे नियोजन केले.

शेवगाव (अहमदनगर) : शेवगाव शहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधीत क्षेत्र असल्याने उपलब्ध झालेल्या खतवाटपासाठी कृषी दुकानदारांनी शहराबाहेर पावती देऊन वाटपाचे नियोजन केले. मात्र खतांच्या टंचाईमुळे शेकडो शेतकऱ्यांनी बीलासाठी एकच गर्दी करत कृषी सेवा केंद्रचालक व पोलिसांची चांगलीच दमछाक केली. कृषी विभागाचे अधिकारी फिरकले नसल्याने गोंधळात आणखी भर पडली.

तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपाची पिके जोमात आहेत. आंतरमशागत करून पिकांना खतांची मात्रा देण्यासाठी शेतकरी खते मिळवण्यासाठी कृषी दुकानात हेलपाटे घालत आहे.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रासायनिक खते उपलब्ध होण्यास अडचणी येत असल्याने तालुक्यात खतांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या आठवडयात उपलब्ध झालेल्या ३७१ टन युरीया खतांचे वाटप करण्यात आले.

तालुक्यात काल २५ टन युरीया खत उपलब्ध झाले. मात्र कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणात आढळल्याने शहर प्रतिबंधीत क्षेत्र करून ता.२८ पर्यंत बंद करण्यात आले आहे. बहुतांश कृषी दुकाने शहरात असल्याने शहरातील गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने शहराबाहेर पाथर्डी रस्त्यावर तीन टेबल लावून शेतक-यांना  बील देऊन टप्प्याटप्प्याने दुकानात व गोडाऊनला पाठवण्यात आले.मात्र खत संपेल या भीतीने बीलासाठी शेकडो शेतक-यांनी गर्दी केली. त्यामुळे फिजीकल डिस्टन्संचा फज्जा उडाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान गोरे यांनी बंदोबस्त ठेवला. दरम्यान तालुक्यातील कृषी सहाय्यकांना वेगवेगळ्या चेकपोस्टवर नियुक्त केलेले असल्याने खत वाटपाचे नियोजन करण्यात कृषी विभागास अडचणी येत आहे. या नियुक्त्या रद्द करून कृषी विभागास मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी तहसीलदार अर्चना भाकड यांचेकडे करण्यात आली आहे.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समितीच्या कृषी विभागातील एकही अधिकारी खत वाटपाकडे न फिरकल्याने दुकानदारांना नियोजन करताना अडचणी आल्या. रांगेत ताटकळत उभे राहूनही अनेक शेतक-यांना खते न मिळाल्याने त्यांनी आणखी गोंधळ घातला.

भाजपचे शहराध्यी अरुण मुंढे म्हणाले, केंद्र शासनाकडून राज्यासाठी पूरेशा प्रमाणात खते उपलब्ध करुन दिली असतानाही महाआघाडी सरकारच्या गोंधळामुळे कृत्रीम टंचाई निर्माण केली जात आहे. भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांना खतासाठी रांगेत उभे रहावे लागले नाही. पिके जोमात असतांना शेतक-यांना खतासाठी होणारा त्रास भाजप सहन करणार नाही. त्यासाठी संघर्ष करु.

शेवगाव तालुका कृषी अधिकारी किरण मोरे म्हणाले, तालुक्यासाठी एक- दोन दिवसांत राष्ट्रीय केमिकल्स व जयकिसान या दोन कंपन्यांचा २५० टन युरीया उपलब्ध होणार आहे. तो सर्व शेतक-यांना मागणीनुसार देण्याचा प्रयत्न आहे. सध्या खतांच्या उपलब्धतेत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शेतक-यांनी युरीया बरोबरच इतर खतांचा संतुलीत वापर करावा.
संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Queue of farmers for purchase of fertilizer in Shevgaon taluka