ठरलं! राहुरीत पुन्हा आठ दिवस लॉकडाऊन

विलास कुलकर्णी
Monday, 7 September 2020

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुरुवारपासून (ता. १०) गुरुवार १७ सप्टेंबरपर्यंत आठ दिवस संपूर्ण राहुरी तालुक्यात 'जनता कर्फ्यू' लागू करण्याच्या निर्णयावर आज (सोमवारी) शिक्कामोर्तब करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहेत.

राहुरी (अहमदनगर) : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुरुवारपासून (ता. १०) गुरुवार १७ सप्टेंबरपर्यंत आठ दिवस संपूर्ण राहुरी तालुक्यात 'जनता कर्फ्यू' लागू करण्याच्या निर्णयावर आज (सोमवारी) शिक्कामोर्तब करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहेत.

राहुरी पालिकेच्या सभागृहात प्रशासन, व्यापारी संघटना व विविध संस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतवरील निर्णय घेण्यात आला. तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम,  व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारख, राहुरी पालिकेचे विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे, चाचा तनपुरे, डॉ. जयंत कुलकर्णी, सूर्यकांत भुजाडी, देवेंद्र लांबे, प्रवीण दरक उपस्थित होते.

'जनता कर्फ्यू' दरम्यान येत्या मंगळवारी (ता. १५) व शुक्रवारी (ता. १८) राहुरी बाजार समितीमध्ये होणारा कांद्याचा मोंढा बंद राहील. शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणू नये. असे बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी बैठकीत घोषित केले. तनपुरे म्हणाले, "तालुक्यात कोरोनाचे संक्रमण वेगाने फैलावत आहे. कोरोना झाल्यानंतर गरिबांना उपचार परवडणारे नाहीत. कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्याची गरज आहे."  नगराध्यक्ष कदम म्हणाले, "लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.  नाशवंत शेतमालाची काळजी घेतली जावी."

तहसीलदार शेख म्हणाले, "तालुक्यात ६५८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. पैकी २४ जणांचा मृत्यू झाला आहे.  कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासनाचा लॉकडाऊन करण्याचा विचार नाही. व्यापारी व नागरिकांनी निर्णय घ्यावा." असे सांगितले. 

व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारख म्हणाले, "बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. दुकानदारांचा जीव धोक्यात आला आहे. राहुरी शहरासह संपूर्ण तालुक्यात काही दिवस कडकडीत बंद ठेवावा." त्यांच्या सूचनेला इतर व्यापाऱ्यांनी अनुमोदन दिले. दूध वितरणासाठी सकाळी एक तास व संध्याकाळी एक तास परवानगी देण्यात आली. दवाखाने व दवाखान्यामधील औषधांची दुकाने वगळता, सर्व दुकाने व व्यवहार आठ दिवस कडकडीत बंद ठेवला जाणार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahuri lockeddown again for eight days from Thursday