कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या नवव्या दिवशीही राज्यशासनाचे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rahuri university agriculture engineering student Agitation

कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या गुरुवारी नवव्या दिवशीही कुठल्याही प्रकारचे आश्वासन न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे बैठे आंदोलन अधिकाधिक आक्रमक बनले.

Student Agitation : कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या नवव्या दिवशीही राज्यशासनाचे दुर्लक्ष

राहुरी विद्यापीठ - २५ जानेवारीपासून सुरू झालेल्या व शांततेत सुरू असलेल्या कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या भावना अनावर झाल्या. गुरुवारी नवव्या दिवशीही कुठल्याही प्रकारचे आश्वासन न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे बैठे आंदोलन अधिकाधिक आक्रमक बनले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर सर्व विद्यार्थी जमा होऊन विद्यापीठाचे काम बंद पाडण्यात आले. प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळच विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडल्यामुळे कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना इमारतीमध्ये आत जाणे अशक्य बनले होते.

प्रमुख मागण्या - कृषी सेवा मुख्य परीक्षा २१ व २२ ला तात्काळ स्थगिती देऊन तसेच अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावा, स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचलनालय स्थापन करून मृदा व जलसंधारण विभागांमध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती करावी तसेच महाराष्ट्र राज्य सेवा २०२३ च्या मुख्य परीक्षेमध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेसाठी वैकल्पिक विषयाचा समावेश करावा या प्रमुख मागण्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत तसेच इतरही कृषी विद्यापीठांतचे कृषी अभियांत्रिकीचे आजी-माजी सर्व विद्यार्थी गेल्या २५ जानेवारीपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत राज्य शासनाने यांची कुठल्याही स्वरूपाची दखल न घेतल्यामुळे संतापाची लाट पसरली आहे.

दरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांतकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विद्यार्थी परिषदेचे डॉ. मुकुंद शिंदे, विद्यापीठाचे कुलसचिव प्रमोद लहाळे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून शासनाच्या संपर्कात असल्याचे समजते.

ब्लॉक - जिल्हा प्रशासनाने घेतली नवव्या दिवशी दखल : दिनांक २५ तारखेपासून सुरू असलेल्या या कृषी अभियांत्रिकी च्या विद्यार्थ्यांचे आंदोलनाची माहिती नवव्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनास कळविल्याचे समजते.

मान्यवरांच्या भेटी - आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार मोनिका राजळे, आमदार निलेश लंके, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पद्मश्री पोपटराव पवार, राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण, माजी खासदार प्रसाद तनपुरे, भाऊसाहेब वाकचौरे, अभाविपचे ओंकार मगदूम, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विद्यापीठ परिषदेचे संजीव भोर, भाजपचे जिल्हाध्यक्ष, सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्षा उषा तनपुरे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.

कृषी अभियांत्रिकीच्या परीक्षा पुढे ढकलल्या - महाराष्ट्र राज्य कृषी परीक्षा मंडळाच्या परिपत्रकानुसार राज्यातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या परीक्षा या १ फेब्रुवारीपासून सुरू होणार होत्या मात्र आता त्या नवीन निर्णयानुसार १३ फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

दरम्यान राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या प्रयत्नांबद्दल सविस्तर माहिती दिली. कुलगुरू यांनी राज्यपाल ना. भगतसिंह कोशियारी यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांबद्दल माहिती दिली व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या चुकीच्या माहितीबद्दल कळविले.

कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनीही कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगितले व लोकसेवा आयोगास जाब विचारला असल्याचे सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनीही वीस मिनिटे चर्चा करून कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या असणाऱ्या विविध योजनांमध्ये कृषी अभियंत्यांचे योगदान किती महत्त्वाचे आहे हे समजावून सांगितले व आयोगाची चुकीची नीती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी कुलगुरू यांना दिले. कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शासनास थोडा वेळ देणे गरजेचे आहे असे मत यावेळी कुलगुरूंनी व्यक्त केले व उपोषण आंदोलनकर्त्यांना आपले आंदोलन थांबवावे अशी विनंती केली.