राहुरी विद्यापीठाचे काम बंद, कर्मचाऱ्यांचा वेतन आयोगासाठी मोर्चा

रहेमान शेख
Monday, 2 November 2020

पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रांगणापासून सुरु झालेला हा मोर्चा विद्यापीठातील फुले पुतळ्यामार्गे जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासकीय इमारतीजवळ थांबविण्यात आला.

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दहा जिल्ह्यांमध्ये तसेच विद्यापीठाच्या मुख्यालयासमोर सुमारे 1200 कर्मचाऱ्यांनी आक्रमक मोर्चाने जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

या मोर्चाचे आयोजन विद्यापीठ कर्मचारी समन्वनय संघाचे उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम, कार्याध्यक्ष डॉ. महावीरसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. राज्यातील कृषी विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांना सुधारीत आश्‍वासीत प्रगती योजनेसहीत सातवा वेतन आयोग पुर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी आज ता. 2 रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सर्व कर्मचारी, प्राध्यापक, महिला कर्मचाऱ्यांनी मोठी उपस्थिती केली होती.

पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रांगणापासून सुरु झालेला हा मोर्चा विद्यापीठातील फुले पुतळ्यामार्गे जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासकीय इमारतीजवळ थांबविण्यात आला. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासन विभागातील सुहास हराळे यांच्याकडे निवेदन देवून शासनाच्या दुर्लक्षाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. 

विद्यापीठातील दहाही जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ता. 27 पासून सर्व कार्यक्षेत्रातील कर्मचारी काळ्या फिती लावून काम सुरु आहे. आज या आंदोलनाचा दुसरा टप्प्यामध्ये ता. 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे. 6 नोव्हेंबर रोजी एक दिवसाची सामुहिक रजा घेवून 7 नोव्हेंबर पासून सर्व अधिकारी व कर्मचारी बेमुदत लेखनीबंद आंदोलन करणार आहेत.

या आशयाचे निवेदन राज्याचे मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री यांच्या सह अन्य मंत्रीमंडळातील सदस्यांना, कृषी परिषदेसह जिल्ह्यातील सर्व नेत्यांना यापुर्वीच दिलेले आहे. 

समन्वय संघाचे उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम, कार्याध्यक्ष डॉ. महाविरसिंह चौहान, सरचिटणिस मच्छिंद्र बाचकर, गणेश मेहेत्रे, महेश घाडगे, जनार्दन आव्हाड, मच्छिंद्र बेल्हेकर, संजय ठाणगे, सुरेखा निमसे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. 

संपादन - अशोक निंबाळकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahuri University closed employees march for pay commission