राहुरी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही मोर्चा

रहेमान शेख
Tuesday, 3 November 2020

विद्यापीठातील दहाही जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात 27 ऑक्‍टोबरपासून कर्मचारी काळ्या फिती लावून काम करीत आहेत. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात काल (ता.2) प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढून कर्मचाऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा घोषणाबाजी करीत विद्यापीठ परिसर दणाणून सोडला. सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढला. 

विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी देवकर, उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम, कार्याध्यक्ष डॉ. महाविरसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा, कुलसचिव मोहन वाघ, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांना निवेदन देवून कर्मचाऱ्यांनी व्यथा मांडल्या.

विद्यापीठातील दहाही जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात 27 ऑक्‍टोबरपासून कर्मचारी काळ्या फिती लावून काम करीत आहेत. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात काल (ता.2) प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढून कर्मचाऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांचे 5 नोव्हेंबरपर्यंत लेखणी बंद आंदोलन चालणार आहे. त्यानंतर एक दिवस सामूहिक रजा घेऊन 7 नोव्हेंबरपासून सर्व अधिकारी-कर्मचारी बेमुदत लेखणी बंद आंदोलन करणार आहेत. त्यात काही अत्यावश्‍यक सेवांना वगळले आहे.

समन्वय संघाचे मच्छिंद्र बाचकर, मच्छिंद्र बेल्हेकर, गणेश मेहेत्रे, डॉ. संजय कोळसे, जनार्दन आव्हाड, मच्छिंद्र बेल्हेकर, संजय ठाणगे, वैशाली तोडमल आदी उपस्थित होते. 

कुलगुरू डॉ. विश्‍वनाथा म्हणाले, की शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. मी कृषिमंत्री व सचिवांशी चर्चा केली असून, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahuri University employees march on the second day