राहुरी कुलगुरु डॉ. के.पी. विश्‍वनाथा यांना ऑनलाईन निरोप

रहेमान शेख
Wednesday, 4 November 2020

डॉ. विश्‍वनाथा म्हणाले, राहुरीच्या ऋणानुबंधामध्ये पाच वर्षे कशी गेली समजलेच नाही, विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कार्य करत असतांना पारदर्शक, गतिमान प्रशासन राबवून प्रामाणिकपणा जपला.

राहुरी (नगर) : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कुलगुरु पदाचा प्रभारी कारभार मिळणे हे माझ्यासाठी मोठी संधी आहे. येथील तंत्रज्ञानाची, संशोधन केंद्रांना भेटी देवून या विद्यापीठाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणार असल्याची माहिती नुतन प्रभारी कुलगुरु डॉ. अशोक धवन यांनी दिली. विद्यापीठाच्या प्रगती आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी मावळते कुलगुरु डॉ. के.पी. विश्‍वनाथा, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

डॉ. धवन म्हणाले, राज्यातील सर्वच विद्यापीठे ही सुमारे 40 ते 45 टक्के रिक्त पदांसह आपले कार्य करत आहेत. याचा परिणाम संशोधन, शिक्षण व विस्तार कार्यावर होत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे देशातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये प्रथम दहामध्ये असलेले विद्यापीठ असून राज्यातील सर्वोत्कृष्ठ असलेल्या या विद्यापीठासाठी कार्य करणे हे माझ्यासाठी खुप मोठी संधी आहे. मनुष्यबळाची टंचाईसाठी राज्य सरकारकडे आग्रहाने मांडणी सुरु आहे. अनेक विद्यार्थीभिमुख व शेतकरीभिमुख कार्यक्रम घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
डॉ. विश्‍वनाथा म्हणाले, राहुरीच्या ऋणानुबंधामध्ये पाच वर्षे कशी गेली समजलेच नाही, विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कार्य करत असतांना पारदर्शक, गतिमान प्रशासन राबवून प्रामाणिकपणा जपला. विद्यापीठामध्ये क्‍लिन कॅम्पस व ग्रिन कॅम्पस या संकल्पना राबविल्या. कर्मचारी भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केल्यानंतर जुलै महिन्यात 50 टक्के रिक्त जागा भरण्याची परवानगी मिळविली. शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री किंमत ठरविता येत नसल्याने शेतकरी आज तोट्यात जातांना दिसून येत आहे.
 
विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. दिलीप पवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. साताप्पा खरबडे यांसह विभागप्रमुखांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले व आभार डॉ. मिलिंद अहिरे यांनी मानले. 

मावळते कुलगुरु डॉ.के.पी. विश्‍वनाथा म्हणाले, कृषी विद्यापीठाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने विद्यापीठाने आपल्यास काय दिले असा विचार करण्यापेक्षा आपल्या विद्यापीठास आपण काय दिले. याकडे लक्ष दिल्यास विद्यापीठाची प्रगती होणार आहे. सातव्या वेतन आयोगाबाबत सुरु असलेल्या संपाचा परिणाम शेतकऱ्यांना होता कामा नये. शेतकरी सुखी राहणे हेच या विद्यापीठाचे ध्येय आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahuris Vice Chancellor Dr. K.P. Vishwanatha has been sent off online Farewell ceremony