दीड लाख हेक्‍टर पिकांचा चुराडा; अतिवृष्टीचा 885 गावांना तडाखा

सूर्यकांत नेटके
Sunday, 1 November 2020

जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या सुरवातीला 10 दिवस झालेल्या जोरदार पावसाने तब्बल एक लाख 63 हजार 840 हेक्‍टरवरील पिकांचा चुराडा केला. जिल्ह्यातील 885 गावांतील दोन लाख 33 हजार शेतकऱ्यांचे पावसाने नुकसान झाले.

अहमदनगर : जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या सुरवातीला 10 दिवस झालेल्या जोरदार पावसाने तब्बल एक लाख 63 हजार 840 हेक्‍टरवरील पिकांचा चुराडा केला. जिल्ह्यातील 885 गावांतील दोन लाख 33 हजार शेतकऱ्यांचे पावसाने नुकसान झाले. अतिवृष्टी व अवेळी पावसाने 81 हजार 907 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. अडीच हजार हेक्‍टरवरील फळबागा पावसाच्या तडाख्यात सापडल्या. दोन तालुक्‍यांतील शेतांत कपाळाला लावायला माती राहिली नाही. 

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारी नियमानुसार तब्बल 182 कोटी 44 लाख रुपये मदतीची गरज आहे. प्रशासनाच्या पंचनाम्यात ही बाब स्पष्ट झाली. जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत सततच्या पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. या काळात 10 ते 12 दिवस पावसाचा जोर एवढा होता, की 885 गावांतील दोन लाख 33 हजार शेतकऱ्यांच्या पिकांचा चुराडा झाला. 641 गावांतील एक लाख 22 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिरायती भागात 37 हजार 855 हेक्‍टर, बागायती भागात 41 हजार 683 हेक्‍टर पिके, तसेच दोन हजार 368 हेक्‍टरवरील फळबागांचे नुकसान झाले. 

नदीला आलेल्या पुराचा 231 गावांना तडाखा बसला. या गावांतील एक लाख 11 हजार 47 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पाथर्डीतील एका गावातील 17 शेतकऱ्यांची 4.65 हेक्‍टर व कर्जत तालुक्‍यातील 12 गावांतील 181 शेतकऱ्यांची 48.40 हेक्‍टर जमीन वाहून गेली. पंचनाम्यात 33 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसानाचीच नोंद होते. त्यापेक्षा कमी नुकसानीची आकडेवारी मोठी आहे. मात्र, त्याची कुठेच नोंद झाली नाही. 13 मे 2015च्या शासननिर्णयानुसार जिरायतीसाठी हेक्‍टरी साडेसहा हजार, तर बागायतीसाठी 13 हजार 500 व फळबागांसाठी 18 हजार रुपये मदत देण्याचे गृहीत धरून प्रशासनाने अहवाल दिला. प्रत्यक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिक मदत देण्याची घोषणा केली. 

बांधांवर जाऊन पंचनामे नाहीत 
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सेवक व ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांच्या बांधांवर जाण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. मात्र, कृषी विभागाने पंचनाम्यांबाबत फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसते. अनेक ठिकाणी कृषी विभागाचे कर्मचारी बांधांवर गेलेच नाहीत. काही ठिकाणी फळबागांचे नुकसान असूनही पंचनामे केले नसल्याचा आरोप होत आहे. याबाबत कृषी व महसूल विभाग एकमेकांकडे बोट दाखवीत आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain damage to crops on 2 lakh hectares in Nagar district