esakal | पुनर्वसू नक्षत्राच्या जलाभिषेकाने निझर्णेश्वर प्रसन्न
sakal

बोलून बातमी शोधा

Nizarneshwar mahadev temple

पुनर्वसू नक्षत्राच्या जलाभिषेकाने निझर्णेश्वर प्रसन्न

sakal_logo
By
सुहास वैद्य

कोल्हार (जि. नगर) : पुनर्वसू नक्षत्राच्या सरींनी शंभूमहादेवाला जलाभिषेक केला आणि डोंगररांगांच्या कुशीत दडलेल्या निझर्णेश्वर महादेव मंदिराचा परिसर प्रसन्नतेने चिंब झाला. उन्हाळ्यातील चटक्यांनी लाही लाही झालेल्या डोंगरमाथ्याचा दाह शांत झाला. आता हा परिसर आसुसलेला आहे तो भरजरी नैसर्गिक हिरवा शालू पांघरण्यासाठी. कोल्हार ते संगमनेरदरम्यानचे हे निसर्गरम्य, प्रसिद्ध शिवलिंग हजारो शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. (Rain-in-nizarneshwar-temple area-in-nagar-district-marathi-news)

एक हजार वर्षांपूर्वीच्या ताम्रपटात उल्लेख

संगमनेर तालुका चहूबाजूने डोंगररांगांमध्ये वसलेला आहे. वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती, निसर्ग हे तालुक्याचे वैशिष्ट्य. बाळेश्वर, खांडेश्वर, दुधेश्वर, निझर्णेश्वर ही महादेवाची स्थाने त्या-त्या भागातील आराध्य ग्रामदैवते आहेत. कोकणगावाजवळ निझर्णेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. एक हजार वर्षांपूर्वीच्या एका ताम्रपटात कोकणेग्रामचा उल्लेख आहे. ते गाव म्हणजेच सध्याचे कोकणगाव. या गावातून पूर्वेला थोडे पुढे गेले, की डाव्या बाजूला एक रस्ता वळतो. आजूबाजूला डोंगररांगा आणि घनदाट झाडीच्या कुशीत निझर्णेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्याचा पूर्वतिहास अज्ञात आहे. मात्र, प्राचीन काळी या भागात दंडकारण्य असावे, असे जाणकार सांगतात. विशेषतः श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीच्या निमित्ताने भरणाऱ्या यात्रेला शिवभक्तांची मांदियाळी असते. मात्र, मागील वर्षीच्या व आताच्या कोविडच्या (Corona) पार्श्वभूमीवर मंदिर परिसराला भाविकांची ओहोटी लागल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा: भारतीय संस्कृतीचा मूलाधार देशी गाय; गायीची माता म्हणून पूजा

मंदिर परिसर हिरवाईने नटू लागला!

कोरोना महामारीप्रमाणेच वरुणराजही कोपला की काय, असे भाविकांना वाटत होते; परंतु वातावरणाचा नूर पालटला. पावसाच्या सरींनी मंदिर परिसर हिरवाईने नटू लागला. येत्या श्रावणात कोरोनाचे मळभ दूर होईल, भाविकांच्या गर्दीने मंदिराचा परिसर पुन्हा खुलून जाईल, असे आशादायी वातावरण निर्माण झाले आहे.

(Rain-in-nizarneshwar-temple area-in-nagar-district-marathi-news)

हेही वाचा: लॉकडाउनकाळात घरच्या घरी 'या' पदार्थांचा अनेकांनी घेतला 'आस्वाद'

loading image