फेसाळणाऱ्या पाण्यासह कळमजाईचा धबधबा वाहतोय सुनासुना!

शांताराम जाधव
Monday, 3 August 2020

पंधरा दिवसांपासून संगमनेर तालुक्याच्या पठार भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे ओढे- नाले भरभरून वाहू लागले आहेत.

बोटा (अहमदनगर) : पंधरा दिवसांपासून संगमनेर तालुक्याच्या पठार भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे ओढे- नाले भरभरून वाहू लागले आहेत. त्यातच छोट्या- मोठ्या धबधब्यांनीही आपले मनमोहक रूपंही दाखविले आहे. कोरोनाच्या कात्रीत पर्यटक अडकल्याने फेसाळणारे पाणी घेऊन धबधबे वाहत आहेत... सुनसुने! त्यापैकी एक कळमजाईचा धबधबा!

घारगावपासून जेमतेम तीन किलोमीटरवर असलेले परिसरात पांडवकालीन कळमजाई मातेचे दगडात कोरलेले मंदिर आहे. भोजदरी, पेमरेवाडी, दारसोंड या पठारवर पडलेल्या पावसातून अनेक भूजलांतून या धबधब्याची निर्मिती होते.

ऑगस्टपासूनच बोटा, घारगाव, अकलापूर, भोजदरी, वनकुटे येथील पर्यटकांची पावले कळमजाई मंदिराकडे वळू लागतात. पाण्याचा खळखळाट, आकर्षक फुलांची उधळण, विविध पक्ष्यांचे मनमोहक आवाज, अधूनमधून दिसणारे मोर, लांडोर, हरणांचे पाडस अशी दृश्ये पाहून पर्यटक मंत्रमुग्ध होतात.फेसाळणाऱ्या पाण्याखाली घटकाभर आनंद घेऊन पर्यटक आपल्या घरी निघून जातात.

यंदा मात्र कोरोनामुळे येथील वन विभागाने या परिसरात पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे. प्रतिवर्षी पक्ष्यांच्या किलबिलाटांसह बालगोपळांच्या दंगा- मस्तीचा घुमणारा आवाज यंदा मात्र हरवूनच गेला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rains in Sangamner taluka water the waterfalls in Bota area