राजेंद्र नागवडे पुन्हा एकदा भाजपमध्ये "ऍक्‍टिव' 

संजय आ. काटे
बुधवार, 27 मे 2020

श्रीगोंद्यातील नागवडे कुटुंबाचे कॉंग्रेस व थोरात हे समीकरण गेली अनेक वर्षे नगर जिल्ह्याने अनुभवले. दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांनी कॉंग्रेस आणि थोरात कुटुंब यांच्याशी कायम जिव्हाळ्याचे संबंध ठेवून श्रीगोंद्यासह नगर जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व ठेवले.

श्रीगोंदे : विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा "हात' सोडून भाजपमध्ये जात आमदार बबनराव पाचपुते यांच्यासाठी मेहनत घेतलेले नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे पुन्हा एकदा भाजपमध्ये "ऍक्‍टिव्ह' झाले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक असणारे नागवडे काल (मंगळवारी) दिवसभर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासोबत तालुका दौऱ्यात दिसले. 

श्रीगोंद्यातील नागवडे कुटुंबाचे कॉंग्रेस व थोरात हे समीकरण गेली अनेक वर्षे नगर जिल्ह्याने अनुभवले. दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांनी कॉंग्रेस आणि थोरात कुटुंब यांच्याशी कायम जिव्हाळ्याचे संबंध ठेवून श्रीगोंद्यासह नगर जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व ठेवले. त्यांच्या निधनानंतर श्रीगोंद्यातील कॉंग्रेसची सूत्रे त्यांचे पूत्र राजेंद्र नागवडे यांच्याकडे आली. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. 

पत्नी अनुराधा नागवडे कॉंग्रेसमध्ये 

दरम्यान, त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांनी महिला प्रदेश कॉंग्रेसच्या माध्यमातून राज्यभर महिला संघटन बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. त्या सध्या कॉंग्रेसच्या माध्यमातूनच जिल्हा परिषद सदस्य आहेत. मध्यंतरी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाशी प्रामाणिक राहत, त्या कॉंग्रेसमध्येच असल्याचे अप्रत्यक्षरित्या दाखवून दिले होते. 

भाजपच्या आंदोलनात सहभाग घेतला नाही

दरम्यान, राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे सरकार आल्यानंतर काही काळ द्विधा मनस्थितीत असलेले राजेंद्र नागवडे यांनी सुरवातीच्या काळात मंत्री थोरात यांच्याशीही संबंध वाढविले होते. त्यामुळे नागवडे पुन्हा कॉंग्रेसमध्ये दिसतील अशी शक्‍यता होती. त्यात राज्यात सत्तापालट झाल्यावर नागवडे हे भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमात दिसले नाहीत. अगदी दोन दिवसांपूर्वी झालेल्या राज्य सरकारच्या आंदोलनातही घरी बसूनही त्यांनी सहभाग घेतला नाही. मध्यंतरी डॉ. विखे पाटील यांनी आढावा बैठक घेतली. राजेंद्र नागवडे तालुक्‍यात असूनही तिकडे फिरकले नाहीत, तर बैठकीला मुलाला पाठविले होते. या सगळ्या परिस्थितीत त्यांचा राजकीय यू-टर्न मानला जात होता. 

डॉ. विखे पाटील यांचे कौतुक

दरम्यान, काल (मंगळवारी) खासदार डॉ. विखे पाटील तालुका दौऱ्यावर आले, त्यावेळी राजेंद्र नागवडे त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमदार बबनराव पाचपुते यांच्यासमवेत दौऱ्यात प्रत्येक गावात पाहायला मिळाले. त्यांच्या वांगदरी गावातही त्यांनी खासदारांचे तोंड भरून कौतुक केले. त्यांना चहापाण्यासाठी घरीही नेले. त्यामुळे राजेंद्र नागवडे हे पुन्हा एकदा भाजपचे संघटन वाढविण्यासाठी "ऍक्‍टिव' झाल्याचे दिसत आहे. मंत्री थोरात व त्यांचे राजकीय संबंध राहिले नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajendra Nagwade is once again active in the BJP.