Breaking : लॉकडाऊन करण्याचा आता कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही

सनी सोनावळे
Monday, 17 August 2020

आमच्या पक्षाशी व समाजाशी बांधिलकी आहे. आमचा राजकारणापेक्षा समाजकारणावर भर आहे. हे कोविड सेंटर देखील याचे घोतक आहे.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : आमच्या पक्षाशी व समाजाशी बांधिलकी आहे. आमचा राजकारणापेक्षा समाजकारणावर भर आहे. हे कोविड सेंटर देखील याचे घोतक आहे. सुपे येथे औद्योगिक वसाहतीकरीता कामगार रूग्णालयाचा विचार करू. पारनेर तालुक्यातील प्रलंबित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रस्तावांना मंजुरी देऊन तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला चालना देणार असल्याचे आश्वासन आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिले.

कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथील आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून सुरू करण्यात एक हजार रूग्ण बेडची क्षमता असणाऱ्या शरदचंद्र पवार कोविड सेंटरचे उद्गाटन डॉ. टोपे यांच्या हस्ते झाले.

डॉ. टोपे म्हणाले, कोरोना झाल्यानंतर रूग्ण मोठ्या प्रमाणात घाबरतो. मात्र या कोविड सेंटरमध्ये आल्यानंतर ही सर्व व्यवस्था पाहुन निश्चित आनंदी होईल. हे एका मंदीराप्रमाणेच वाटत आहे. आता लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही. टप्प्याटप्याने सगळे क्षेत्र सुरू करणार आहोत. 

ग्रामीण भागात काही आजार अंगावर काढले जातात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ रूग्णालयात जाऊन आपली ऑक्सिजन लेव्हलसह इतर तपासणी करा. वयस्कर लोकांनी तर याकडे दुर्लक्ष करून नये लवकर रूग्णालयात आले तर आपला प्राण वाचु शकतो. याकरीता जनजागृती करणे गरजेचे आहे. आमदार लंके यांची लोकांमधील आमदार म्हणून जी ओळख आहे, ती ते सक्षमपणे हाताळत आहेत.

सर्वांच्या बरोबरीने सरकार सक्षमपणे काम करत आहोत. रुग्णवाहिका मोफत ठेवल्या आहेत, स्त्राव तपासणी किंमती कमी केल्या आहेत. अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अधिकार देण्यात आले आहेत. मास्कच्या किंमतीबाबत देखील त्या कमी करण्यासंदर्भात सरकार गांभिर्याने विचार करत आहेत. आहेर बंधुनी सेंटरसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल टोपे यांनी त्यांचा सत्कार केला.

आमदार लंके म्हणाले, वाढती रूग्णसंख्या लक्षात तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने या कोविड सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये रूग्ण आल्यानंतर तो आनंदी कसा राहील याकरीता अनेक खेळ, मनोरंजनाची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. यावेळी लंके यांनी तालुक्यातील ढवळपुरी, चोंभुत, पळवे, गुणोरे, अस्तगाव येथील प्रलंबित प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीबाबत, सुपे येथे ट्रामा सेंटर, कामगार रूग्णालय यासंह अन्य मागण्या टोपे यांच्याकडे केल्या. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajesh Tope said no decision will be taken to lockdown now