
राम शिंदे म्हणतात, जामखेडच्या लोकप्रतिनिधींना फक्त मिरवायचंय
जामखेड : ""प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जामखेडमध्ये कोरोना उपचारादरम्यान अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यास लोकप्रतिनिधी, अधिकारी व सरकार सर्वस्वी जबाबदार आहे. एकीकडे नागरिक जीवन-मरणाचा संघर्ष करीत आहेत आणि दुसरीकडे लोकप्रतिनिधी "फ्लेक्स'च्या माध्यमातून स्वतःची छबी मिरवण्यात धन्यता मानत आहेत,'' असा घणाघाती आरोप माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी केला. (Ram Shinde says that Rohit Pawar's administration is unplanned)
हेही वाचा: अजितदादांना लागली नीलेश लंकेंच्या आरोग्याची काळजी
शिंदे यांनी काल (ता. 11) जामखेडमधील सर्व खासगी कोविड सेंटरना भेट देत तेथील रुग्ण व डॉक्टरांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, ""जामखेड शहरातील कोविड सेंटरला भेट दिली असता, बेड उपलब्ध आहेत; मात्र, प्रशासनाकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने रुग्णांना दाखल करून घेता येत नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
डॉ. रवी व डॉ. शोभा आरोळे गेल्या वर्षभरापासून कोविड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करीत आहेत. त्यांना राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून मदत केली जाते. मात्र, लोकप्रतिनिधी या कोविड सेंटरसमोर स्वतःचा फोटो असलेला फ्लेक्स लावून प्रसिद्धी मिळवित आहेत.
या कोविड सेंटरला राज्य व केंद्राची मदत मिळत असल्याने तेथे पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांचेही फोटो असायला हवे होते. मात्र, लोकप्रतिनिधी प्रसिद्धीसाठी हपापलेले असल्याने त्यांना त्याचे भान नाही. ग्रामीण रुग्णालयात असा फ्लेक्स लावलेला आहे.'' स्वतःचा फ्लेक्स लावायचाच होता, तर स्वतःच्या खर्चाने जामखेडमध्ये स्वतंत्र कोविड सेंटर लोकप्रतिनिधीने सुरू करायला हवे होते, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ ओमासे, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान मुरूमकर, नगरसेवक अमित चिंतामणी, तालुका सरचिटणीस लहू शिंदे, जिल्हा सरचिटणीस पांडुरंग उबाळे, प्रवीण चोरडिया, तात्याराम पोकळे, गोरख घनवट आदी उपस्थित होते.
मृत्यूंचा आकडा लपवला जातोय
तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, हा आकडा लपविण्याचे काम तालुका प्रशासनाकडून केले जात आहे, असा आरोप यावेळी माजी मंत्री राम शिंदे यांनी केला. (Ram Shinde says that Rohit Pawar's administration is unplanned)
Web Title: Ram Shinde Says That Rohit Pawars Administration Is
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..