
जनावरे आणि भाजीपाल्याच्या आठवडेबाजारातून राशीन ग्रामपंचायतीला दरवर्षी अर्धा कोटीचे निश्चित उत्पन्न मिळते. बैलबाजारांतून कर्जत बाजार समितीलाही चांगले उत्पन्न मिळते.
राशीन : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेला आणि राज्यात प्रसिद्ध असलेला येथील आठवडेबाजार लॉकडाऊननंतर आता पुन्हा नव्याने कात टाकू लागला आहे. राज्याच्या विविध भागांतून गायी-बैल, शेळ्या-मेंढ्यांचे व्यापारी खरेदीसाठी येथील आठवडेबाजारात पूर्वीप्रमाणे येत आहेत.
राशीनचा जनावरांचा आठवडेबाजार राज्यात प्रसिद्ध आहे. पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, बीडसह कर्नाटकमधून मोठ्या संख्येने व्यापारी येथील बाजारात येतात. दर आठवड्याला येथे जनावरांच्या खरेदी-विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते. संकरित गायी, खिलारी बैल, म्हशी, शेळ्या-मेंढ्यांचा मोठा व्यापार येथे होतो. त्यांच्या खरेदीसाठी सुमारे 200 टेम्पो आणि पिकअप भरून जनावरे घेऊन येथून व्यापारी जातात.
हेही वाचा - महादेव जानकरांना दोन खासदार, ५० आमदार निवडून आणायचेत
जनावरे आणि भाजीपाल्याच्या आठवडेबाजारातून राशीन ग्रामपंचायतीला दरवर्षी अर्धा कोटीचे निश्चित उत्पन्न मिळते. बैलबाजारांतून कर्जत बाजार समितीलाही चांगले उत्पन्न मिळते. अनेकांच्या रोजीरोटीचा आधार असलेला हा बाजार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद झाल्यावर अनेकांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता.
भाजीबाजारासोबतच आता जनावरांचा बाजारही जोमाने फुलू लागला आहे. आर्थिक उलाढालीमुळे राशीनच्या आठवडेबाजारात पूर्वचैतन्य आले आहे. परिसरातील व्यापारी, दलाल आणि शेतकऱ्यांना या आठवडेबाजाराचा मोठा आधार आहे.
भाजीबाजारासह मिठाई, स्टेशनरी, कटलरी, फळविक्रेते, कापड दुकानदार, किराणा दुकानदार यांच्याही मालाला चांगली मागणी वाढल्याने मोठ्या यात्रेप्रमाणे भरणारा राशीनचा आठवडेबाजार पूर्वीप्रमाणे भरू लागला आहे.
लॉकडाऊननंतर सुरू झालेले आठवडेबाजार नावापुरतेच भरत होते. कोरोनाच्या भितीने लोक बाजाराकडे फिरकत नव्हते. मात्र, आता ही भिती लोकांमधून गायब झाली असून, बाजारांना यात्रेचे स्वरूप आले आहे.