रेशन पुरवठादाराच म्हणातायेत आम्ही दिवाळीत गरजुंना धान्य देऊ शकलो नाही

शांताराम काळे 
Saturday, 28 November 2020

अकोले तालुका अतिदुर्गम त्यात कोरोना महामारीमुळे रोजगार नाही. मजुरी नसल्याने हातात सणासुदीला पैसे नाही. कुणी मजुरी देत नाही. अशा वेळी महागाचे धान्य आणि साखर घेणे परवडत नाही. त्यात सरकारी धान्य स्वस्थ दरात मिळेल म्हणून रेशनची वाट पाहणारी दारिद्र्य रेषेखालील माणसे दिवाळीत वाट पाहून थकली मात्र धान्य मिळाले नाही.

अकोले (अहमदनगर ) : तालुक्यात ऐन दिवाळीत गरीब आदिवासी, मागास, वंचित, शोषित, अंध, अपंग, विधवा, मजूर यांना रेशनचे धान्य आणि साखर मिळाली नसल्याने त्यांची दिवाळी कडूच गेली. मात्र त्यांना रेशन मिळाले नाही हे दस्तूर खुद्द ४० रेशन पुरवठादार यांनीच अकोले तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले. तसेच रेशन पुरवठा झाला नसल्याने आम्ही रेशन दिवाळीत देऊ शकलो नसल्यामुळे झारीतील शुक्राचार्य कोण ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. नियोजनाचा अभाव आणि वाहतूक ठेकेदार पुढारी असल्याने हम करोसे कायदा उक्तीप्रमाणे सार्वजनिक वितरण व्यवस्था कोलमडली आहे. 

अकोले तालुका अतिदुर्गम त्यात कोरोना महामारीमुळे रोजगार नाही. मजुरी नसल्याने हातात सणासुदीला पैसे नाही. कुणी मजुरी देत नाही. अशा वेळी महागाचे धान्य आणि साखर घेणे परवडत नाही. त्यात सरकारी धान्य स्वस्थ दरात मिळेल म्हणून रेशनची वाट पाहणारी दारिद्र्य रेषेखालील माणसे दिवाळीत वाट पाहून थकली मात्र धान्य मिळाले नाही.

पेठेवाडी ग्रामस्थांनी माजी आमदार वैभव पिचड यांच्या माध्यमातून तहसीलदार कचेरीवर ठिय्या आंदोलन केल्यावर त्यांना धान्य मिळाले मग प्रत्येक गावांनी मोर्चे काढायचे का ? तर कुमशेत, केळुंगण, एकदरे, शेरणखेल, कोलटेभे, चंदगीरवाडी, शेंडी, साकीरवाडी, शेलविहिरे शिंगणवाडी, आंबड, लहवित, डोंगरगाव, देवठाण आदी ४० गावात रेशन पोचलेच नाही. त्यामुळे रेशनधारकांना धान्य उपलब्ध झाले नसल्याचे अकोले तालुका स्वस्थ धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणपत भांगरे, बन्सी अस्वले, भास्कर बुळे, मुरलीधर सुपे आदी चाळीस दुकानदारांनी लेखी निवेदनाद्वारे सांगितले आहे. 

रात्रीच्या वेळी वाहतूक करू नये, असे निर्देश असताना वाहतूक रात्री बेरात्री केली जाते. वाहतूक ठेका पुढारी माणसांकडे असल्याने यात मोठा गोंधळ असल्याची चर्चा आहे. तत्कालीन संगमनेर पोलिस अधिकारी यांनी संगमनेरकडे जाणारी ट्रक पकडूनही पुरवठा विभागाने माल आमचा नाही असे लेखी दिले. त्यामुळे पुरवठा अधिकारी व वाहतूकदार यांचे साठे लोटे असल्याची चर्चा असून झारीतील शुक्राचार्य कोण त्याचा लोकप्रतिनिधींनी तपास करावा व संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. तर हमाल व गोडाऊनचे पैसेही थकीत असल्याचे संबंधितांनी सांगितले. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The ration supplier said that we could not provide grain to the needy on Diwali