शेवगावच्या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमणे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

आंबेडकर चौकातील जुन्या विश्रामगृहासमोरील पाथर्डी रस्त्यावरील टपऱ्यांची अतिक्रमणे रस्त्यांचा श्‍वास मोकळा केला. पालिका, सार्वजनिक बांधकाम, महसूल विभाग व पोलिसांनी संयुक्तरित्या ही मोहीम राबविल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले होते.

शेवगाव : सहा महिन्यांपूर्वी काढलेली शहरातील अतिक्रमणे पुन्हा "जैसे थे' झाली. शहरात प्रमुख रस्त्याच्या दोन्ही बाजू पूर्वीपेक्षा दुपटीने अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. प्रशासनाच्या कारवाईनंतर अवघ्या काही महिन्यांत ही परिस्थिती निर्माण झाल्याने, प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

सहा महिन्यांपूर्वी परिविक्षाधीन अधिकारी म्हणून तीन महिन्यांसाठी आलेल्या तहसीलदार असिमा मित्तल यांनी शहरातून जाणाऱ्या पाथर्डी, नगर, पैठण, नेवासे यांसह अंतर्गत रस्त्यांवर व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण काढण्याचा धुमधडाका लावला होता. त्यामुळे शहरातील रस्त्यांनी कधी नव्हे तो मोकळा श्वास घेतला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गटारीवरील पायऱ्या, ओटे, शेड, टपऱ्या काढल्या. 

आंबेडकर चौकातील जुन्या विश्रामगृहासमोरील पाथर्डी रस्त्यावरील टपऱ्यांची अतिक्रमणे रस्त्यांचा श्‍वास मोकळा केला. पालिका, सार्वजनिक बांधकाम, महसूल विभाग व पोलिसांनी संयुक्तरित्या ही मोहीम राबविल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले होते. तहसीलदार मित्तल यांची मार्चमध्ये बदली झाल्यानंतर ही मोहीम थंडावली. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने प्रशासनाचे लक्ष तिकडे वळले. तहसीलदारपदावरही दोन-तीन महिने प्रभारीराज असल्याने अतिक्रमणांचा विषय थंड बस्त्यात गेला. ही बाब हेरून दुकानदारांनी दुप्पट जागेत पाय पसरले. 
गटारीवरील पायऱ्या, शेड, ओटे रात्रीतून उभे राहिले. आंबेडकर चौकातील विश्रामगृहासमोरील रिकामी जागा तीन महिन्यांतच टपऱ्या, दुकानांनी व्यापल्या. त्यातील बहुतांश ठिकाणी अनधिकृत मावाविक्री राजरोस सुरू आहे. 

पिचकाऱ्यांनी रंगले रस्ते 
शहरात सुरू असलेल्या मावा विक्रीमुळे अनेक जण या व्यसनात अडकले आहेत. कोरोनाच्या काळात मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, सुरक्षित अंतर ठेवणे, असे नियम प्रशासनाने घालून दिले आहेत. मात्र, माव्याचे व्यसन करणारे कुठल्याच नियमांचे पालन करीत नाहीत. मावा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकत असल्याने रस्ते, शासकीय कार्यालयाच्या भिंती, दुकानांसमोरील ओटे रंगलेले असतात. प्रशासनाने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Re-encroachment on Shevgaon road