Video : रोहित पवार म्हणतात... पारनेरचा ‘तो’ कार्यक्रम ठरवूनच केला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

पारनेर तालुक्यातील पाच शिवसेनेचे नगरसेवक फुटून राष्ट्रवादीत गेले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घडवून आणला. त्यामुळे या राजकीय घरफोडीचे पडसाद राज्यभर उमटले.

नगर : पारनेर तालुक्यातील पाच शिवसेनेचे नगरसेवक फुटून राष्ट्रवादीत गेले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घडवून आणला. त्यामुळे या राजकीय घरफोडीचे पडसाद राज्यभर उमटले. त्यामुळे महाविकास आघाडीतही तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे. राज्याचे राजकारण त्यामुळे ढवळून निघाले आहे. याबाबत आमदार लंके यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

बारामती ॲग्रोच्या माध्यमातून सिव्हील हॉस्पीटलमध्ये मास्क, चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी नगरचे आमदार संग्राम जगताप, डॉ. रणजीत सत्रे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, डॉ. नितीन पिसाळ आदी उपस्थित होते.

रोहित पवार बोलत होते. ते म्हणाले, पारनेरमधील नगरसेवकांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम हा ठरवून झाला आहे. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी याबाबत बोलणे झाले होते. ते नगरसेवक स्थानिक राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीत आले आहेत. आमच्या पक्षात आले नसते तर ते दुसऱ्या (भाजप) पक्षात गेले असते.  
याबाबत माजी आमदार विजय औटी ‘सकाळ'शी बोलताना म्हणाले होते, विधानसभा सदस्य असताना, माझ्या पाठपुराव्याने नगरपंचायतीची स्थापना झाली. त्यानंतर निवडणूक झाली. जनतेने माझ्याकडे पाहून या नगरसेवकांना मतदान केले. मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासकामे केली. मी कुठेच कमी पडलो नाही. मात्र, हे नगरसेवक स्वार्थासाठी तिकडे गेले का, हे पुढील निवडणुकीत जनता ठरवील. त्यावर मी काही बोलणार नाही. प्रत्येक पक्षाचे काही संकेत असतात. तसे शिवसेनेचेही आहेत. शिवसेना शिस्त पाळणारा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाचे प्रवक्ते व वरिष्ठ नेतेच या पक्षप्रवेशाविषयी बोलतील. राज्यात तिन्ही पक्षांचे एकत्र सरकार आहे. राष्ट्रवादी आपला पक्ष कशा पद्धतीने वाढवीत आहे, हे वरिष्ठांना समजले आहे. याबाबत काय करायचे व काय भूमिका घ्यायची, हे वरिष्ठ नेते ठरवतील, असेही औटी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reaction of MLA Rohit Pawar on the admission of corporators in Parner taluka