esakal | कांदा लागवड करताय, कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला आवश्‍य वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Read the advice of agriculture officials for planting onions

सर्वत्र चांगला पाऊस असल्याने व कांद्याला मध्यांतरी मिळालेल्या दरामुळे कांद्याची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

कांदा लागवड करताय, कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला आवश्‍य वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पोहेगाव (अहमदनगर) : सर्वत्र चांगला पाऊस असल्याने व कांद्याला मध्यांतरी मिळालेल्या दरामुळे कांद्याची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पर्यायाने यावर्षी सर्वत्र कांदा बियाणांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा कोपरगावसह सर्वत्रच झाला आहे.

ज्यांच्याकडे बियाणे होती त्यांनी ती बियाणे 12  ते 18 हजार रुपये पायलीच्या दराने विकले. तर दुकानात विविध कंपन्यांचे बियाणे सुमारे साडेतीन हजार रुपये किलोने विकले गेले आहे. काही ठिकाणी यापेक्षाही जादा दराने बियाणे विक्री केली गेली आहे. कांद्याचे भाव मध्यंतरी दोन- तीन दिवस 12 हजाराच्या आसपास गेले होते. आताही पाच हजाराच्या आसपास भाव आहे. 

सगळीकडे चांगला पाऊस झाल्याने हमखास दोन पैसे होतील या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे यावर्षी कल आहे. परंतु अगोदर टाकलेल कांदा बियाणे जास्त पावसामुळे नव्वद टक्के शेतक-याचे फेल गेले आहेत. आता जिथे मिळेल व जे मिळेल ते बियाणे आणुन पुन्हा रोप तयार करुन कांदा लागवड करण्याची तयारी शेतकरी करत आहे. पंरतु यात काही ठिकाणाच्या बियाणाची फसवणुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कांदा रोपे तयार करतांना शेतकरी बंधूनी घेवायची काळजी 

यावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे कांदा बियाणे पुरेशा प्रमाणात उत्पादन न झाल्याने कांदा बियाणे पुरवठा मोठ्या प्रमाणावर होण्यात अडचण निर्माण झाली आहे. सर्वत्र शेतकऱ्यांची कांदा लागवडीसाठी कांदा बियाणे मागणी वाढली आहे. त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध झालेले बियाण्यांपासून चांगल्या प्रकारची रोपे तयार करणे आवश्यक आहे. त्याकरिता कांदा रोपे तयार करीत असतांना शेतकरी बंधूंनी पुढील प्रमाणे काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी दिलेला हा सल्ला

ही घ्या काळजी

 1. - शेतकऱ्यांनी रोपवाटिकेसाठी चांगली सुपीक व निचऱ्याची जमीन निवडावी. उगीच समस्यायुक्त, हरळी, लव्हाळा यासारखी तणे असणारी, तणनाशकांच्या अतिवापराने खराब झालेली, क्षारपड,चोपण असलेली जमीन निवडू नये. 
 2. - या वर्षी खरीप हंगामात चांगला पाऊस झाला असल्याने शेतातील पिकांचे अवशेष जमिनीवर पडून शेतात बुरशीजन्य रोगांचे प्रमाण जास्त आढळून येत आहे. याकरिता शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार करण्यापूर्वी रोपवाटिका क्षेत्रावर चांगले कुजलेले शेणखत व ट्रायकोडर्मा पावडर यांचे मिश्रण करून चांगले मिसळून घ्यावे व गादीवाफे तयार करावेत. 
 3. - रोपवाटिकेसाठी लागवड क्षेत्राच्या 10 ते 12 टक्के क्षेत्र तयार करावे. कमी क्षेत्रावर जास्त दाट लागवड करू नये. 
 4. - कांदा रोपे रोपवाटिकेमध्ये तयार करण्यासाठी गादीवाफ्यांचाच वापर करावा. 
 5. - एक मीटर रुंदीचे, 15 सें.मी. उंचीचे व 3-4 मीटर लांबीचे गादीवाफे तयार करावेत. प्रत्येक गादीवाफा करतांना युरीया 50 ग्रॅम व सुफला (15:15:15) 100 ग्रॅम मिसळून गादीवाफा सारखा करावा. 
 6. - गादीवाफ्यावर पेरणी करतांना 10 सेंमी.अंतरावर 2 सेंमी.खोलीच्या समांतर रेषा पाडून बियाणे पातळ पेरावे व मातीने झाकावे. एक चौरस मीटर क्षेत्रावर 10 ग्रॅम बियाणे पेरावे. पेरणी पुर्वी प्रतिकिलो बियाण्यास 2-3 ग्रॅम कार्बेन्डेझिम (बावीस्टीन) चोळावे. बियाण्याची उगवण चांगली होईपर्यंत झारीने पाणी द्यावे. 
 7. - जमिनीतील किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेरणीवेळी रिजेन्ट /फ्युरी सारख्या किटकनाशकांचा पेरणी वेळी वापर करावा. 
 8. - रोपवाटिकेतील पाण्याचा निचरा चांगला असावा, तसेच वेळेवर तणनियंत्रण व कीड नियंत्रण करावे. 
 9. - उपलब्ध बियाण्यापासून जास्तीत जास्त निरोगी कांदा रोपे लागवडीस उपलब्ध होतील याची काळजी घ्यावी. 
 10. - हरभऱ्याच्या आकाराच्या गाठी तयार झाल्यावर तयार झालेल्या रोपांची वेळेवर पुनर्लागवड करावी. 
 11. - पुनर्लागवड करण्यापूर्वी 24 तास आधी रोपवाटिकेस भरपूर पाणी द्यावे म्हणजे रोपे काढणे सुलभ होईल. 
 12. - पेरणीपुर्वी खरेदी केलेल्या बियाणयातील थोडे बियाणे घेवून त्याची उगवणक्षमता ओल्या बारदान्यात तीन दिवस टाकून परीक्षणकरून घ्यावे. 
 13. - सरकार मान्य नामांकित दुकानातूनच चांगल्या कंपनीचे चांगले वाण निवडावे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image