esakal | तुम्ही एखाद्या फळबागेने पुनर्जन्म घेतल्याचं पाहिलंय? शिर्डीत घडलं हे
sakal

बोलून बातमी शोधा

Rebirth of a farmer's orchard in Shirdi

गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात पहिल्यांदा फळबाग लागवडीचे श्रेय रावबहाद्दूर नारायण बोरावके, त्यांचे व्यवस्थापक हरिभाऊ भोंगळे व पुणेकर मंडळींना जाते.

तुम्ही एखाद्या फळबागेने पुनर्जन्म घेतल्याचं पाहिलंय? शिर्डीत घडलं हे

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

राहाता ः देशात सर्वाधिक पेरू बागांचे क्षेत्र, अशी राहाता तालुक्‍याची गेल्या 15-20 वर्षांपूर्वीची ओळख इतिहासजमा झाली. गोदावरी कालव्याच्या पाण्याचा अभाव, सुत्रकृमींच्या हल्ल्याने येथील बागांचे क्षेत्र घटले. या स्थित्यंतरात येथील जाणकार फळउत्पादक सतीश भोंगळे यांच्या शेतातील तब्बल 65 वर्षे वयाची बाग मात्र डौलात फुलत राहिली. आता तिचा पुनर्जन्म झाला आहे. 

गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात पहिल्यांदा फळबाग लागवडीचे श्रेय रावबहाद्दूर नारायण बोरावके, त्यांचे व्यवस्थापक हरिभाऊ भोंगळे व पुणेकर मंडळींना जाते. ऊसलागवडीचे तंत्र विकसित करण्याचे श्रेयही पुणेकर मंडळीचेच. त्या काळी लावलेल्या पेरू बागेची पुढे सतीश भोंगळे यांनी उत्तम पद्धतीने निगा राखली. त्यामुळे या बागेने 60 वर्षांहून अधिक काळ उत्पन्न दिले.

हेही वाचा - शिर्डीला आलेल्या भाविकांवर काळाचा घाला

जीर्णोद्धार करण्यापूर्वी आठ एकरांवरील या बागेतील प्रत्येक झाडापासून पेरूचे सरासरी 200 किलो उत्पादन मिळत असे. मात्र, झाडांची उंची 30 फुटांहून अधिक वाढल्याने तोडणीच्या खर्च वाढला. त्यावर उपाय म्हणून नव्या तंत्राचा आधार घेऊन जमिनीपासून तीन फूट उंचीपर्यंतचे खोड शाबूत ठेवून उर्वरित बाग कापून टाकली. त्यातून तब्बल 650 मेट्रिक टन सरपण मिळाले. 

जीर्णोद्धारानंतर केलेल्या मशागतीमुळे आता वर्षभरातच या बागेला आठ फूट उंचीचे जोमदार धुमारे फुटले आहेत. सध्या प्रत्येक झाडातून सुमारे 20 किलो फळउत्पादनाची अपेक्षा आहे. पुढील चार-पाच वर्षांत पूर्वीसारखे उत्पन्न सुरू होईल. सुत्रकृमींपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक झाडाला पाच किलो लिंबोळी व करंजी पेंड टाकली जाते. झाडाभोवती गोलाकार खोदून त्यात शंभर किलो शेणखत व पाच किलो रासायनिक खत टाकले जाते. गरजेनुसार पाणीव्यवस्थापन व कीटकनाशकांची फवारणी केली जाते. 

पाण्याची उपलब्धता आणि उत्तम निगा राखली, तर पेरूची बाग 60-65 वर्षे चांगले उत्पन्न देऊ शकते. हे आमच्या बागेने सिद्ध केले. जीर्णोद्धार केल्याने ही बाग आता शंभरी पार करणार, यात शंका नाही. नगर जिल्ह्यातील हे एकमेव उदाहरण आहे. 10-15 वर्षांत पेरू बागा निकामी होतात, असा आजवरचा अनुभव आहे. लखनौ-49 ही 65 वर्षांपूर्वी लावलेली पेरूची जात आजही टिकून आहे, हे आमच्या बागेने सिद्ध केले. 
- सतीश भोंगळे, जाणकार फळउत्पादक