कुत्रे एकदाच भुंकले, नंतर त्याचा आवाजच बंद: बिबट्याच्या शिकारीचा थरार मोबाईलमध्ये कैद

सतिश वैजापुरकर
Saturday, 31 October 2020

मध्यरात्री दीडची वेळ... कुत्रे एकदाच भुंकले... नंतर त्याचा आवाज बंद झाला तो कायमचाच! नांदुर्खी येथील मधुकर वाणी यांच्या वस्तीवरील कुत्र्यावर बिबट्या झेपावला.

शिर्डी (अहमदनगर) : मध्यरात्री दीडची वेळ... कुत्रे एकदाच भुंकले... नंतर त्याचा आवाज बंद झाला तो कायमचाच! नांदुर्खी येथील मधुकर वाणी यांच्या वस्तीवरील कुत्र्यावर बिबट्या झेपावला. घरातील मुले खिडकीतून बिबट्याच्या शिकारीचे चित्रण करीत होती. त्यांच्यापासून अवघ्या १० फुटांवर अंगणात दणकट बिबट्याची स्वारी रुबाबात उभी होती. 

क्षणार्धात त्याने झाडाला बांधलेल्या कुत्र्यावर, दुसऱ्यांदा भुंकण्याची संधी न देता झडप घातली. गोठ्यातील जनावरे भीतीने चिडीचूप झाली. फाडलेली शिकार तो अधाशासारखी खाऊ लागला. त्याला घराच्या खिडकीत हालचाल दिसली. रक्ताने माखलेल्या चेहऱ्याने त्याने खिडकीकडे रोखून पाहिले. एका मुलाने खिडकीतून हळूच आवाज दिला.. शुऽऽक..! तसा तो ताडकन्‌ उठला. खिडकीकडे भेदक नजर टाकून हळूहळू दूर जात अंधारात गडप झाला. साधारण 10 मिनिटांचा हा थरार वस्तीवरील मुलांच्या मोबाईलमध्ये कैद झाला. 

याबाबत शेतकरी मधुकर वाणी म्हणाले, की हा बिबट्या गुरुवारी रात्री वस्तीवर आला होता. आम्ही त्याला पिटाळले. वस्तीवरील जनावरांच्या गोठ्याभोवती कुंपण आहे. मात्र, त्याची नजर पाळीव कुत्र्यावर होती. तो पुन्हा येईल, या भीतीने आम्ही सावध झोपलो होतो. आमचा अंदाज खरा ठरला. काल रात्री दीडच्या सुमारास तो आला. त्याने झाडाला बांधलेल्या कुत्र्याला फक्त एकदाच भुंकण्याची संधी दिली. अवघ्या पाच मिनिटांत निम्म्याहून अधिक शिकार फस्तदेखील केली. मुलांनी आवाज केल्याने तो निघून गेला. 
वन खात्याने तातडीने पिंजरा लावणे आवश्‍यक आहे. लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. भोवताली ऊस व पाणी असल्याने बिबट्याला चांगला निवारा मिळाला आहे. या भागात भीतीचे वातावरण असल्याचे वाणी यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Record in mobile of leopard attack on dog