esakal | रेमडेसिव्हिर रामबाण नाहीच, कोरोनावर असे करा उपचार

बोलून बातमी शोधा

Remedivir injection is not effective in corona disease

रेमडेसिव्हिर रामबाण नाहीच, असे करा उपचार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

शिर्डी ः ""रेमडेसिव्हिर हे जीव वाचविणारे औषध नाही. त्यासाठी भारतात रांगा लागत असतील, तर त्याबाबत जागृतीची गरज आहे. संसर्गानंतर पहिल्या दहा दिवसांत कोविड विषाणू शरीरात जिवंत असतो. तोपर्यंतच रेमडेसिव्हिर काम देऊ शकते. रुग्ण ऑक्‍सिजन किंवा व्हेंटिलेटरवर असेल तर ते मुळीच कामाचे नाही.

पहिल्या दहा दिवसांत रुग्णाला स्टेरॉईड देणे धोक्‍याचे व ऑक्‍सिजन कमी असताना तातडीने देणे गरजेचे असते. उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना याबाबत विचारणा करायला शिका,'' असा सल्ला दुबईतील थुम्बे कोविड रुग्णालयाचे संचालक डॉ. अविनाश पुलाटे यांनी दिला आहे.

विविध देशांत कार्यरत असलेल्या नगर जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ग्लोबल नगरी फाउंडेशनतर्फे आयोजित ऑनलाइन चर्चासत्रात डॉ. पुलाटे बोलत होते. देशभरात रेमडेसिव्हिरचा जाणवणारा तुटवडा व काळाबाजार, त्यासाठी कोविड रुग्ण व नातेवाइकांची चाललेली धावपळ, या पार्श्वभूमीवर या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. पुलाटे म्हणाले, ""आम्ही पंधरा हजार कोविड रुग्ण बरे करताना रेमडेसिव्हिरचा वापर केला नाही. हे औषध कोणाचा प्राण वाचविणारे मुळीच नाही. अन्य देशांत त्याचा फारसा वापर होत नाही. बाधा झाल्यानंतर दहा दिवसांनी शरीरातील कोविड विषाणू मरतात. कधी कधी लक्षावधी मृत विषाणूंसोबत शरीराच्या प्रतिकारशक्तीची लढाई सुरू झाल्याने रुग्णाची तब्येत खालावते. त्याला ऑक्‍सिजन किंवा व्हेंटिलेटरवर जाण्याची वेळ येते.

अशा वेळी स्टेरॉईड हे फुफ्फुस संसर्ग रोखण्यासाठी कामी येते. मात्र हे स्टेरॉईड पहिल्या दहा दिवसांत विषाणू शरीरात जिवंत असताना दिले तर अनर्थ घडू शकतो. पहिल्या दहा दिवसांत लक्षणानुसार उपचार, व्हिटॅमिनच्या गोळ्या व अँटिव्हायरल औषधे, तर ऑक्‍सिजनची गरज भासेल त्यावेळी स्टेरॉईड व रक्त पातळ होण्याचे औषध, अशी उपचारपद्धत जगात रूढ झालेली आहे.

 • डॉ. अविनाश पुलाटे म्हणतात...

 • मास्क सूर्याच्या दिशेने धरला आणि त्यातून प्रकाश आला नाही, तर तो योग्य.

 • नाका-तोंडाद्वारे किती कोविड विषाणूंची संख्या गेली, यावर आजाराची तीव्रता अवलंबून आहे.

 • 99 टक्के रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत बरे होतात.

 • व्हिटॅमिन-डी घेणे उपयुक्त, व्हिटॅमिन-सी महत्त्वाचे.

 • झिंकयुक्त गोळ्या घ्यायला हरकत नाही.

 • ऑक्‍सिजन बेड असणाऱ्या कोविड रुग्णांनी फुफ्फुसासाठी दर अर्ध्या तासाने कूस बदलावी. पालथे झोपणे चांगले.

 • मृतदेहाद्वारे संसर्ग फैलावतो का, याबाबतच्या संशोधनाचे निष्कर्ष पुढे आलेले नाहीत.

 • पहिल्या दहा दिवसांत शरीरातील कोविड विषाणू मरतात; मग त्यापुढे संसर्ग कसा फैलावेल, हा प्रश्न असून, त्याचे उत्तर सापडलेले नाही.

 • शरीरातील ऑक्‍सिजन कमी व्हायला लागला, की प्रगत देशांत लगेचच ऑक्‍सिजन बेड व अन्य सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे तेथे रुग्ण घरीच उपचार घेणे पसंत करतात.

 • संसर्ग झाला तरी वीस टक्के रुग्णांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते.

 • कोविडची लस हे सर्वांत प्रभावी हत्यार आहे.

 • लसीकरणामुळे इस्राईल, ब्रिटन, अमेरिका, दुबईत कोविड नियंत्रणात

 • कोविड बरा झाल्यानंतर अँटिबॉडी किती दिवस शरीरात टिकून राहतात, हे सिद्ध झालेले नाही. त्यामुळे तो पुन्हा होऊ शकतो.

 • बातमीदार - सतीश वैजापूरकर