esakal | पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडची अवघ्या तीन वर्षात दूरवस्था
sakal

बोलून बातमी शोधा

Remote condition of Service Road on Pune Nashik National Highway

संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गासह कडेला असलेल्या गावांकडे जाण्यासाठी ठेकेदार कंपनीने बनवलेल्या सर्व्हिस रोडची, तीन वर्षाच्या कालावधीत देखभाल दुरुस्ती अभावी दुरवस्था झाली आहे.

पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडची अवघ्या तीन वर्षात दूरवस्था

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गासह कडेला असलेल्या गावांकडे जाण्यासाठी ठेकेदार कंपनीने बनवलेल्या सर्व्हिस रोडची, तीन वर्षाच्या कालावधीत देखभाल दुरुस्ती अभावी दुरवस्था झाली आहे.

यावर्षी सरासरीपेक्षा अधीक झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड वाहून गेला आहे. महामार्गावरील प्रवाशी वाहनांकडून लाखो रुपयांचा टोल वसूल करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवासीवर्गातून होत आहे.

संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा बाह्यवळण रस्ता, माहुलीचा एकल घाट, डोळासणेचा उड्डाणपुल व चंदनापुरी घाट या सर्व ठिकाणी असंख्य लहान मोठे खड्डे पडले आहेत. दिवसा तसेच रात्रीही मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ असलेल्या या महामार्गावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने, भरधाव वेगातील वाहनांवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात खड्ड्यात वाहने आदळून किंवा दुभाजकावर धडकून दररोज छोटे मोठे अपघात होतात. या घटनांमध्ये वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच प्रवाशांनाही इजा होत आहे. या महामार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी वारंवार करून करूनही याकडे संबंधित विभाग आणि ठेकेदार कंपनी दुर्लक्ष करीत आहे. 

या रस्त्यावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर छोट्या-मोठ्या मालवाहू आणि प्रवासी वाहनांकडून लाखो रुपयांचा टोल वसूल केला जातो. या महामार्गावरील प्रवासासाठी वाहनचालकही मोठ्या प्रमाणात टोल भरतात. ‘टोलवसुली’ सुरु असेपर्यंत या मार्गाचा वापर करणार्‍या वाहनधारकांची सुरक्षितता आणि रस्त्याची निगा राखण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारीही टोल वसुल करणार्‍या कंपनीची असते मात्र खड्डे बुजविण्याची तसदी ठेकेदार कंपनी घेत नाही. टोल प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन, प्रवाशांच्या जीवाशी खेळणे बंद करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

संगमनेरची जटील वाहतुक समस्या सुटून पुणे नाशिक दरम्यान प्रवास करणार्‍यांचा वेळ वाचावा यासाठी महामार्गाला बाह्यवळण रस्त्याची मागणी पूर्ण करण्यासाठी तयार झालेला हा महामार्ग 1 जानेवारी 2017 रोजी वाहतुकीला खुला झाला होता. मात्र याची अनेक कामे अद्यापही अपूर्णावस्थेत आहेत. महामार्गाच्या डोळासणे विभागाचे पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी प्रकल्प संचालकांना पाठवलेल्या पत्रात कर्‍हे ते बोट्यापर्यंतच्या महामार्गावरील अपघातांची कारणे, रस्त्याची स्थिती, घाटातील रस्त्यांची अवस्था याबाबत माहिती दिली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image