पारनेर बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटवली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

अनेकांच्या टपऱ्या धनदांडग्यांच्या होत्या. त्यांनी त्या भाडेपट्ट्यांनी चालविण्यास दिल्या होत्या. त्यामुळे ही कारवाई योग्यच असल्याची चर्चा शहरात होती. 
 

पारनेर ः शहरातील तहसील कार्यालयासह बसस्थानक परिसरातील अतिक्रमणांवर महसूल विभागाने कारवाई केली. त्यामुळे परिसरात होणारी वाहतूककोंडीची समस्या दूर झाली आहे.

तालुक्‍यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी गेली दोन दिवस तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली. त्यामुळे वाहतूककोंडी होत होती. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या बसस्थानक परिसरातही अतिक्रमणामुळे नेहमी कोंडी होत होती.

तहसील कार्यालय, तसेच बसस्थानक परिसरातील अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढावीत, असे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले होते. काहींनी स्वतःहून अतिक्रमणे काढली. मात्र, काही तशीच होती.

तहसील कार्यालयाला टपऱ्यांचा वेढा पडल्याने कार्यालयात येतानाही अडथळे येत होते. तीच अवस्था बसस्थानकाची होती. मंगळवारी (ता. 29) रात्री उशीरा तहसीलदार देवरे व पोलिस निरीक्षक घनश्‍याम बळप यांच्या मदतीने प्रथम तहसील कार्यालयाजवळील व नंतर बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे काढली. त्यामुळे तहसील कार्यालय व बसस्थानक परिसराने मोकळा श्‍वास घेतला.

अनेकांच्या टपऱ्या धनदांडग्यांच्या होत्या. त्यांनी त्या भाडेपट्ट्यांनी चालविण्यास दिल्या होत्या. त्यामुळे ही कारवाई योग्यच असल्याची चर्चा शहरात होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Removed encroachments in Parner bus stand area