गणेशोत्सवातील धार्मिक कार्यकम कोरोना योध्दाच्या हस्ते करा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 July 2020

कोरोनाच्या संकटाचा प्रत्येकाने विचार करून येणारा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याची गरज आहे. यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक गाव, एक गणपती संकल्पना राबविण्यात यावी, असे आवाहन भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

कोपरगाव ( अहमदनगर) : कोरोनाच्या संकटाचा प्रत्येकाने विचार करून येणारा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याची गरज आहे. यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक गाव, एक गणपती संकल्पना राबविण्यात यावी, असे आवाहन भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीसाठी पत्रक काढले आहे. त्या त्यांनी म्हंटले की, दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मोठया उत्साहामध्ये साजरा करून सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून कलागूणांना वाव दिला जातो. सध्या जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढलेला असून देशभर आणि राज्यभरातही या आजाराला तोंड देत आहे. या आजाराचा सामना करण्याकरीता लॉकडाऊन सारखे निर्णय घेतले गेले. उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे अर्थव्यवस्था बिकट झाली. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत अनेक गणेशोत्सव मंडळांनी कार्यक्रमाचे स्वरूप मर्यादित ठेवण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कोरोना संकटकाळाच्या परिस्थितीत गणेशोत्सव मोठया प्रमाणात साजरा करणे, निश्चितच योग्य नाही. आर्थीक संकटाला सामोरे जातांनाच या आजाराच्या संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी प्रशासन, विविध सामाजिक संस्था वारंवार आवाहन करून हा संसर्ग वाढणार नाही. यासाठी जनजागृती करत आहे. त्यामुळे याही गोष्टीचा विचार करता गणेशोत्सवाचे स्वरूप मर्यादित असावे, तसेच या दरम्यान दैनंदिन आरती, धार्मिक कार्यक्रम हे प्रशासनाच्या वतीने सेवा देणाऱ्या कोरोना योध्दयांच्या हस्ते करण्यात यावे. सर्व दु:ख दूर करणाऱ्या आणि संकटहरण करणाऱ्या श्री गणेशाच्या या उत्सवाला एक गाव, एक गणपती ही मोहीम राबवून नागरीकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, यासाठी घालुन दिलेल्या नियम व अटींचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A request to make a village a Ganpati in Maharashtra on the background of Corona