रथी महारथींना नगरपालिकेत जाण्यासाठी घ्यावा लागणार पत्नी किंवा इतर प्रभागाचा आधार घ्यावा

सचिन सातपुते
Saturday, 12 December 2020

शेवगाव नगरपरीषदेच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीचे बिगुल वाजले.

शेवगाव (अहमदनगर) : शेवगाव नगरपरीषदेच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीचे बिगुल वाजले. भावी नगरसेवकांची आरक्षणानुसार प्रभाग शोधण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे.

21 पैकी अवघे सहा प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने उर्वरीत 15 प्रभाग महिला व मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. विदयमान नगरसेवकांसह अनेक रथी महारथींना नगरपरीषदेत जाण्यासाठी पत्नी किंवा इतर प्रभागाचा आधार घ्यावा लागणार आहे. नगरपरीषदेच्या
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ऐन गुलाबी थंडीत शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. 

शेवगाव नगरपरीषदेची मुदत 7 फेब्रुवारी 2021 रोजी संपत असून तत्पूर्वी नवीन सभागृह अस्तित्वात येण्यासाठी प्रभाग रचना व आरक्षणाची सोडत नुकतीच जाहीर झाली आहे. त्यामध्ये अनेक प्रभाग महिला व वेगवेगळ्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सर्व पक्षीय इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

नगरपरीषदेत कुठल्याही परिस्थितीत नगरसेवक म्हणून जायचेच असा चंग बांधलेल्या प्रत्येक प्रभागातील किमान 8 ते 10 जणांची चांगलीच गोची झाली आहे. तर मागील वेळी आरक्षीत असलेले प्रभाग खुले झाल्याने भावी नगरसेवकांच्या इच्छा अपेक्षांना राजकीय धुमारे फुटू लागले आहेत. महिलांसाठी आरक्षीत असलेल्या 11 प्रभागात इच्छा नसतांना देखील पत्नी किंवा घरातील इतर महिलेस पुढे करावे लागणार असल्याने ब-याच जणांचे तळयातमळ्यात सुरु झाले आहे. तर मागास प्रवर्गातून उमेदवारी करण्यासाठी ओबीसी दाखल्यांसाठी पाठपुरावा सुरु झाला आहे.

निवडणुकीची तारीख अदयाप जाहीर झाली नसली तरी कोणत्या पक्षाकडून कोणत्या प्रभागात कोण उमेदवारी करणार आहे या चर्चांनी शहरातील वातावरण चांगलेच गरम झाले आहे. 

गुलाबी थंडीत रात्री उशीरा चौकाचौकात, गल्लीबोळात प्रभाग निहाय संभाव्य उमेदवार, पक्ष, आघाडी, अपक्ष या बाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. मागील वेळी थोडयाफार मताने पराभूत झालेल्या उमेदवारांनाही पुन्हा एकदा आपले नशीब आजमावयाचे असून त्या दृष्टीने आतापासूनच राष्ट्रवादी व भाजप या प्रमुख पक्षासह तिसरी आघाडीकडेही उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादी व भाजप या दोन्ही पक्षांना नगरपरीषदेत अडीच अडीच वर्ष समान संधी मिळाली असली तरी शहरातील सर्व सामान्य नागरीकांचा मात्र अपेक्षा भंग झाला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडील मातब्बर असंतुष्टांच्या तिस-या आघाडीचे ही सुतोवाच मिळू लागले आहेत. आता सर्वच प्रमुख पक्ष व उमेदवार नेमके कोणत्या मुदयावर निवडणुक लढवणार आहेत. याबाबत नागरीकांमध्ये उत्सुकता आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reservation in 21 out of 15 divisions in Shevgaon municipality