तनपुरे कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर... ‘यांना’ मिळणार संधी

विलास कुलकर्णी
Monday, 3 August 2020

डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील व उपाध्यक्ष शामराव निमसे यांनी दिलेले पदाचे राजीनामे सोमवारी (ता. ) संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले.

राहुरी (अहमदनगर) : डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील व उपाध्यक्ष शामराव निमसे यांनी दिलेले पदाचे राजीनामे सोमवारी (ता. ) संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली १० दिवसात नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार आहे.
 

चार वर्षांपूर्वी तनपुरे कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासदांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन मंडळाच्या ताब्यात कारखान्याची सूत्रे दिली. त्यावेळी आर्थिक परिस्थितीमुळे कारखाना बंद पडला होता. उदयसिंह पाटील व शामराव निमसे यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर कारखाना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला. तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा बँकेचे कारखान्याचे थकीत कर्जाचे पुनर्गठन करण्यास मदत केली. त्यामुळे, मोठा अडसर दूर झाला.
 

तीन वर्ष बंद पडलेला कारखाना पूर्ववत सुरू झाला. दोन वर्ष हंगाम यशस्वी पार पडला. गेल्यावर्षी ऊस टंचाईमुळे कारखाना बंद राहिला. त्यामुळे जिल्हा बँकेचे कर्ज थकले. कारखाना पुन्हा बँकेच्या ताब्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली. परंतु, पुन्हा एकदा माजी आमदार कर्डिले मदतीला धावले. खासदार डॉ. विखे पाटील, कारखान्याचे अध्यक्ष पाटील, उपाध्यक्ष निमसे व संचालक मंडळाच्या विनंतीवरून, जिल्हा बँकेने कर्जफेडीसाठी एक वर्ष मुदतवाढ दिली. त्यामुळे कारखान्याचा आगामी गळीत हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.

पुढील वर्षी कारखान्याची निवडणूक होणार आहे. एक वर्षासाठी नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड होणार आहे. कारखान्याचे सूत्रधार आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे व्याही नामदेवराव ढोकणे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते. याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे.
 

कारखान्याचे मार्गदर्शक आमदार राधाकृष्ण विखे- पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. प्रतिकूल परिस्थितीत श्रेष्ठींच्या व सभासदांच्या आशीर्वादाने जबाबदारी यशस्वी पार पाडली. याचे समाधान आहे. चार वर्षांपूर्वी ठरल्याप्रमाणे श्रेष्ठींच्या आदेशानुसार २८ जुलैला मी व उपाध्यक्ष निमसे यांनी राजीनामा दिला. सोमवारी संचालक मंडळाच्या बैठकीत दोघांचे राजीनामे मंजूर झाले.

- उदयसिंह पाटील, अध्यक्ष, तनपुरे साखर कारखाना

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resignation of Chairman and Deputy Chairman of Tanpure Factory in Rahuri