esakal | क्रीडा क्षेत्रात जामखेडचं नाव राज्यात पोहचविणारे वैजीनाथ सोनवणे यांचे निधन

बोलून बातमी शोधा

 Vaijnath Kundlik Sonawane
क्रीडा क्षेत्रात जामखेडचं नाव राज्यात पोहचविणारे वैजीनाथ सोनवणे यांचे निधन
sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड (अहमदनगर) : क्रीडा क्षेत्रात जामखेडचं नाव राज्यात पोहचविणारे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक वैजीनाथ कुंडलिक सोनवणे यांचे कोरोनाच्या संसर्गाने उपचारा दरम्यान सोलापूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने माध्यमिक विद्यालयातून खेळाडू घडविणारे चालते बोलते विद्यापीठ हरपले आहे. ही बातमी जामखेड तालुक्यात समजताच क्रीडाक्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली.

सोनवणे हे व्ही.के. सोनवणे या नावाने रयत शिक्षण संस्थेत ओळखले जायचे. क्रीडा शिक्षक म्हणून 33 वर्षे सेवा केली. यापैकी तब्बल 28 वर्षे जामखेड तालुक्यात सेवा केली. यामध्ये खर्डा, आरणगाव व जामखेड या तिन्ही शाखांमध्ये त्यांनी सेवा केली. क्रीडा क्षेत्रातील अनेक पुरस्काराने त्यांचा गौरव झालेला होता. संपूर्ण तालुक्यात त्यांचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या माध्यमातून राज्य पातळीवर शेकडो विद्यार्थी पोहचले आणि चमकले ही.

एक शिस्त प्रिय क्रीडा शिक्षक अशी त्यांची ओळख होती. शाळा भरल्यापासून सुटेपर्यंत सोनवणे हे मैदान सोडत नव्हते. त्यामुळे विनाकारण मैदानावर हिंडणा-यांची हिंमत होत नसायची; असा आदरयुक्त दबदबा त्यांनी संपूर्ण सेवा काळात टिकवून ठेवला. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्याला त्याच खेळात नैपुण्य मिळावे याकरिता त्यांची धडपड आणि तळमळ होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ते कमालीचे लोकप्रिय होते. तीन वर्षापूर्वी व्ही.के. सोनवणे सेवानिवृत्त झाले. त्यांचे मूळ गाव शिराढोण ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद होते. मात्र जामखेडशी त्यांची जोडलेली नाळ त्यांनी कायम जपली.

गेली तीन आठवड्यापूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यांच्यावर तुळजापूर, उस्मानाबाद व सोलापूर अशा तिन्ही ठिकाणी उपचार केले. मात्र त्यातून ते बाहेर पडले नाहीत. त्यांची रविवारी (ता.02) रोजी मध्यरात्री उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने क्रीडाक्षेत्रातील एक दूरदृष्टी असलेला क्रीडा प्रशिक्षक हरपला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजयी, उच्च विद्या विभूषित एक मुलगा, दोन मुली तिघेही अमेरिकेत नोकरी करीत आहेत. मुली विवाहित आहेत.