सात- बारा, आठ अ मधील दुरुस्ती करण्याची युवक काँग्रेसची मागणी

सनी सोनावळे
Tuesday, 22 September 2020

पारनेर तालुक्यातील शेतकर्‍यांना 2018 चा रब्बीचा पिकविमा मंजूर झाला असूनही अद्यापही शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत. 

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील शेतकर्‍यांना 2018 चा रब्बीचा पिकविमा मंजूर झाला असूनही अद्यापही शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत. दुसरीकडे ऑनलाईन सातबारा- आठ अ मध्ये महसूल प्रशासनाकडून मोठ्या प्रामाणावर चुका झाल्या असून त्या चुका तातडीने दुरुस्त कराव्यात, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश शिंदे यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.

संगमनेर येथील संपर्क कार्यालयात हे निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते धोंडिभाऊ शिंगोटे, तुकाराम रोकडे, सोमनाथ वाकचौरे उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्र राज्यात जिल्ह्यात व पारनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे सन 2018 चा पिकविमा मंजूर झाला असला शेतकर्‍यांच्या खात्यावर अद्यापर्यंत एक रुपया जमा झाला नाही. त्यामुळे तातडीने हा पिक विमा जमा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

महसूल प्रशासनाच्यावतीने सातबारा व आठ ऑनलाईन करण्यात आले असून नोंदी करताना कमी क्षेत्र लागणे, नाव दुरुस्ती इतर गंभीर चुका असून यामुळे शेतकर्‍यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामुळे तातडीने चुका दुरुस्त करण्यासाठी विशेष सप्ताहाचे आयोजन करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Revenue Minister Balasaheb Thorat demand for amendment of Youth Congress in Sat Bara