देशातील बलात्कार थांबणार नसतील तर महिलांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्या

मार्तंड बुचुडे
Wednesday, 7 October 2020

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील बलात्कार व हत्याप्रकरणी तेथील राज्य सरकार व केंद्र सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे.

पारनेर (अहमदनगर) : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील बलात्कार व हत्याप्रकरणी तेथील राज्य सरकार व केंद्र सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे. तसेच माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या दलित कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी तालुक्यातील महिलांनी सुपे येथे नगर- पुणे माहामार्गावर रस्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त केला.

यावेळी सुपे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांना मागण्यांचे निवेदन दिले. 
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरूणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार व हत्याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकार तसेच केंद्र सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. आरोपींना सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोपही महिलांनी केला. यावेळी महिलांच्या भावना तीव्र होत्या.  भोसले यांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेऊन निवेदन स्वीकारले.

राजेश्वरी कोठावळे यांनी केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत देशातील बलात्कार थांबणार नसतील तर महिलांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी. तसेच आरोपींना तात्काळ फाशी द्यावी गुन्ह्याची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी, अशीही मागणी केली. या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गप्प का असा सवाल करत महिलांनी पोलिस निरीक्षक भोसले यांना बांगड्यांचे पार्सल व निवेदन शहा यांच्यापर्यंत पाठवावे, असा आग्रह धरला. यावेळी रोहिणी वाघमारे, शुभांगी पठारे, राजश्री पवार, प्रांजल शिंदे, सुमन कोठावळे, प्रणाली सरोदे, मयुरी शिंदे, निकिता औटी, पल्लवी औटी, प्राजक्ता गाडगे, सानिया शेख, मुस्कान सय्यद आदी महिला उपस्थित होत्या.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road block by women on Nagar Pune Highway in Parner taluka