
शेलार म्हणाले, की शहरातील शहा व समर्थ गार्डनचा लोकार्पण सोहळा काम अपूर्ण असताना झाला. कार्यकाळ संपत आल्याने उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी घाईगडबडीत हा कार्यक्रम उरकला.
कर्जत : नगरपंचायतीतर्फे दोन उद्यानांचा लोकार्पण सोहळा झाला. हा शासकीय कार्यक्रम असताना मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार रोहित पवार यांचे नाव टाळले.
याबाबत उपनगराध्यक्ष नामदेव राऊत आणि मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा करावा, अशी मागणी युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील शेलार यांनी केली आहे.
शेलार म्हणाले, की शहरातील शहा व समर्थ गार्डनचा लोकार्पण सोहळा काम अपूर्ण असताना झाला. कार्यकाळ संपत आल्याने उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी घाईगडबडीत हा कार्यक्रम उरकला.
कार्यक्रमाच्या कोनशिलेवर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार पवार यांचे नाव प्रोटोकॉलप्रमाणे असणे गरजेचे होते; परंतु ते टाळले. नगराध्यक्षपदाचा कालावधी संपत आलेला असताना, पाणीयोजनेच्या उद्घाटनाची घाई केली होती. नळाला येणारे पाणी शुद्ध असल्याचे ते आज सांगतात; मग भाजपचे पदाधिकारी टॅंकरवर राऊत यांचा फोटो लावून प्यायचे पाणी का वाटतात?
नगरपंचायतीतर्फे पाण्याचे खासगी टेंडर का काढले जाते, याचे उत्तर राऊत यांनी द्यावे. किती नगरसेवक या योजनेतील नळाचे पाणी पितात, तेही सांगावे.''
बागेच्या उद्घाटन कार्यक्रमात उपनगराध्यक्ष राऊत यांनी, माजी मंत्री राम शिंदे यांनी 99 कोटींचा विकासनिधी दिल्याचे सांगितले, तर शिंदे यांनी 125 कोटींचा निधी दिल्याचे त्याच सभेत सांगितले. निधीच्या तफावतीचा खुलासाही त्यांनी करावा, असे आवाहन शेलार यांनी केले.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, सचिन सोनमाळी, प्रा. सतीश पाटील, रज्जाक झारेकरी, जाकिर सय्यद, नाथा गोरे, राहुल नेटके, सुशील मराळ आदी उपस्थित होते.