esakal | यांचं वेगळंच असतंय भो ः ना फ्लेक्स, ना बॅनर तरीही रोहित पवारांच्या बर्थ डेचा वेगळाच दणका
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar's birthday celebrated with social activities

कार्यकर्त्यांनीही विधायक दृष्टीकोन समोर ठेवत आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा केला. बर्थ डे सेलिब्रेशनही करतानाही त्यांनी वेगळाच फंडा वापरल्याची चर्चा आहे.

यांचं वेगळंच असतंय भो ः ना फ्लेक्स, ना बॅनर तरीही रोहित पवारांच्या बर्थ डेचा वेगळाच दणका

sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी अल्पावधीतच मतदारांच्या मनावर पकड निर्माण केली आहे. कोणतेही काम करताना ते पायापुरते पाहत नाहीत. कामाचा समाजासाठी दूरगामी किती परिणाम होईल, हेच ते पाहत असतात. आज त्यांचा वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. परंतु आमदार पवार यांनी कोणतीही बॅनरबाजी न करता विधायक कामासाठी वेळ आणि पैसा देण्याचे आवाहन केलं होतं.

आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस वेगवेगळ्या सामाजिक आणि विधायक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनीही विधायक दृष्टीकोन समोर ठेवत आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा केला. बर्थ डे सेलिब्रेशनही करतानाही त्यांनी वेगळाच फंडा वापरल्याची चर्चा आहे.

आज कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मात्र, यात वेगळेपण होते आणि ते ठळकपणे जाणवत होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोव्हिड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड, ऑक्सी मीटर, पीपीई किट भेट देण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्याबरोबर मास्क भेट देण्याबरोबरच जास्त ऑक्सिजन देणारे झाड देत आठवण म्हणून शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.

राष्ट्रवादी नेते श्याम कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती अश्विनी कानगुडे यांच्या माध्यमातून पन्नास टक्के सवलतीत आटा चक्की वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब थोरात यांनी आमदार पवार यांच्या मदतीच्या आव्हानाला प्रतिसाद देत कोव्हिड सेंटरला दोन लाखांची रोख मदत दिली. राष्ट्रवादी युवक चे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे व विद्यार्थी काँग्रेसचे स्वप्नील तनपुरे, व ओंकार गुंड च्या माध्यमातून रक्तदान शिबिर, ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा, जेष्ठांना आधारासाठी काठी वाटप आदी उपक्रम राबविण्यात आले.

या निमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले व युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेवक सचिन घुले यांच्या माध्यमातून मोफत आरओ पाणीवाटप शुभारंभ करण्यात आला. पुणे येथील नगरसेविका प्रिया शिवाजी गदादे यांच्या वतीने मोफत दीड हजार वृक्षांची रोपे वाटण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते सचिन सोनमाळी व नगरसेविका मनिषा सोनमाळी यांच्या माध्यमातून पन्नास टक्के सवलतीत कडबा कुट्टी वाटप करण्यात आले.

युवा नेते सावन शेटे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे ऋषिकेश धांडे यांच्या हस्ते स्नेहप्रेम अनाथगृहात मोफत खाऊवाटप झाले. इतर नेत्यांचे वाढदिवस म्हणजे मोठं मोठे फ्लेक्स, जाहिरातबाजी, फटाके, कार्यकर्त्यांची चमकोगिरी या सगळ्यांना फाटा देत वेगळेपण जपत वाढदिवस साजरा करण्यात आला.


माझ्या वाढदिवस सामाजिक आणि विधायक उपक्रमांनी साजरा करा. कोव्हिड सेंटरला मदत करा तसेच कोरोना योध्यांना सन्मानित करा. एखादया गरजू मात्र गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरा, ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे .एखाद्या विद्यार्थ्याला त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नसेल मोबाईल भेट द्या यासह विविध सामाजिक उपक्रम राबवा.

-रोहित पवार, आमदार ,कर्जत जामखेड

संपादन - अशोक निंबाळकर