संगमनेर तालुक्यातील फादरवाडीचे ग्रामस्थ रोहित्र जळाल्याने त्रस्त 

आनंद गायकवाड
Sunday, 29 November 2020

दिवाळीच्या आधीपासून संगमनेर शहराजवळच्या जोर्वे रस्त्यावरील फादरवाडी परिसरातील रोहित्र जळाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.

संगमनेर (अहमदनगर) : दिवाळीच्या आधीपासून संगमनेर शहराजवळच्या जोर्वे रस्त्यावरील फादरवाडी परिसरातील रोहित्र जळाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. वारंवार मागणी करूनही रोहित्र दुरुस्त न झाल्याने, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी : संगमनेर खुर्द परिसरातील फादरवाडीच्या आसपास मंडलिक, जोर्वेकर व मेहेत्रे मळा, बागवान मळा आदी वस्त्या आहेत. या परिसरातील कृषिपंपांसाठी असलेल्या रोहित्रावर 10 वीजजोड आहेत.

परिसरातील शेती, तसेच पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था यामुळे होते. या रोहित्रात 15 दिवसांपूर्वी बिघाड झाला. तेव्हापासून या परिसराचा वीजपुरवठा बंद आहे. वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली गेली नाही. शेतीसह जनावरे व पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. या रोहित्रावर 100 लोकसंख्येच्या वस्त्या अवलंबून आहेत.

उघड्या खोक्‍यासह कट-आउटमध्ये खोचलेल्या तारांमुळे अनवधानाने धक्का लागल्यास अपघाताचा धोका संभवतो. लवकरात लवकर हे रोहित्र दुरुस्त करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. 

रोहित्रावर 70 ते 80 एच.पी.चा लोड आहे. परिसरातील मागणी केलेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या रोहित्रावरून वीज उपलब्ध करून दिली असून, या ठिकाणी नवीन रोहित्र लवकरच बसविण्यात येणार आहे. 
- विश्‍वजित मोडक, सहायक अभियंता, वीज वितरण कंपनी 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohitra a villager of Fadarwadi in Sangamner taluka is suffering from burns