कोविड लसीकरणासाठी ‘रोटरी' पहिल्या टप्प्यात चार कोटींचा निधी संकलित करून केंद्र सरकारला देणार 

सतिश वैजापूरकर
Wednesday, 9 December 2020

जागतिक पातळीवर पोलिओ लसीकरण मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रोटरीने कोविड लसीकरणातही सहभागाची पुर्वतयारी सुरू केली आहे.

शिर्डी (अहमदनगर) : जागतिक पातळीवर पोलिओ लसीकरण मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रोटरीने कोविड लसीकरणातही सहभागाची पुर्वतयारी सुरू केली आहे. किमान एका गरजूला मोफत कोविड लस देण्याचा संकल्प भारतातील सव्वा लाख रोटरी सदस्यांनी केला आहे.

त्यासाठी पहिल्या टप्प्यात चार कोटी रुपये निधी संकलीत करून तो केंद्र सरकारकडे दिला जाईल. त्यासाठी वातावरण निर्मिती व्हावी, या हेतूने बंगळुरू व परिसरातील 22 रोटरी सदस्यांनी चार हजार किलोमीटरची दुचाकी रॅली काढली. 

शिर्डी येथे काल (मंगळवारी) रॅलीचे आगमन झाले. अजित राम व प्रशांत मनोहर यांच्याकडे रॅलीचे नेतृत्व आहे. दुचाकीस्वारांनी साईदर्शन घेतले. लवकरच कोविडचे उच्चाटन होऊ दे, अशी प्रार्थना केली. इंटरनॅशनल फेलोशिप ऑफ मोटारसायकलींग रोटेरियन संघटनेच्या माध्यमातून ही जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. हॉटेल स्वामी रिसोर्ट येथे शिर्डी रोटरी क्‍लबचे अध्यक्ष प्राचार्य ज्ञानेश डांगे, सचिव माजिद पठाण, उपप्रांतपाल अभय दुनाखे, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष विलास कोते, उद्योजक राजेंद्र कोते, आकाश सोनार, ऍड. बाळासाहेब कोते, महेंद्र कोते व नीलेश गंगवाल आदींनी त्यांचे स्वागत केले. 

शिर्डी रोटरीचे अध्यक्ष प्राचार्य ज्ञानेश डांगे म्हणाले, की प्रांतपाल हरिष मोटवानी यांच्या पुढाकारामुळे या उपक्रमात सहभाग घेता आला. रोटरीतर्फे आयोजित रॅली 18 दिवसांत चार हजार किलोमीटर अंतर पार करील. त्यातील 13 रोटरी क्‍लबतर्फे रॅलीचे स्वागत केले जाईल. कोविड निधी संकलनाचा संकल्प केला जाईल. बंगळुरू, शिर्डी, मुंबई, गोवा ते पून्हा बंगळुरू असा प्रवास ही रॅली करीत आहे. देशातील किमान एका गरजूच्या कोविड लसिकरणाचा खर्च करण्याचा संकल्प प्रत्येक रोटरी सदस्याने केला आहे. प्रत्यक्षात कोविड लसीकरणात रोटरी फार मोठे आर्थिक योगदान देणार आहे. डॉ. पी. जी. गुंजाळ, डॉ. एम. वाय. देशमुख, अभियंता शरद निमसे यांच्या हस्ते सदस्यांचा सत्कार करण्यात आला. 

कोविड लसीकरणात जागतिक पातळीवर रोटरी क्‍लब महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पूर्वी आंतरराष्ट्रीय रोटरीकडून निधी मिळविण्यासाठी भारतीय रोटरीचा पुढाकार असे. आता आंतरराष्ट्रीय रोटरीला देणगी देण्यास भारत पहिल्या दहा देशांत आहे. कोविड लसीकरणासाठी भारतातील रोटरी सदस्य मोठे योगदान देतील. किमान शंभर कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडे दिला जाईल. 
- राजेंद्र कोते, माजी उपप्रांतपाल, शिर्डी 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rotary will provide four crore to the government for the covid vaccine