मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातूनही सुटले आवर्तन

विलास कुलकर्णी
Sunday, 17 January 2021

मुळा धरण शाखाधिकारी अण्णासाहेब आंधळे म्हणाले, की, काल (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शंभर क्‍यूसेकने आवर्तन सोडले.

राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून आज (शनिवारी) सायंकाळी सहा वाजता 551 क्‍यूसेकने रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडण्यात आले. उद्या (रविवारी) सकाळी सहा वाजता विसर्ग वाढवून 707 क्‍यूसेक होईल.

राहुरी, नेवासे, पाथर्डी व शेवगाव तालुक्‍यांतील 32 हजार हेक्‍टर क्षेत्र यातून ओलिताखाली येणार असल्याचे मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले. 

मुळा धरण शाखाधिकारी अण्णासाहेब आंधळे म्हणाले, की, काल (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शंभर क्‍यूसेकने आवर्तन सोडले. त्यात वाढ करून आज (शनिवारी) सकाळी सहा वाजता डाव्या कालव्याद्वारे 150 क्‍यूसेकने विसर्ग सुरू केला. येत्या दोन-तीन दिवसांत उजव्या कालव्याचे आवर्तन 1400 क्‍यूसेकपर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविले जाईल. उजव्या कालव्याचे आवर्तन 40 दिवस चालेल. त्यासाठी, धरणातून चार हजार 500 दशलक्ष घनफूट पाणीवापर होईल. अहमदनगर

शेतकऱ्यांनी कालव्यात विद्युतपंप टाकून अनधिकृत पाणीउपसा करू नये. कालव्याच्या आसपासचा विद्युतपुरवठा खंडित केला आहे. सिंचनात पाण्याचा वापर काटकसरीने करावा. 
- सायली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, नगर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rotation also escaped from the right canal of Mula dam