चाळींमध्ये सडलेला कांदा खत म्हणून शेतात 

Rotten onion in the fields as manure
Rotten onion in the fields as manure
Updated on

शिर्डी : यंदा उन्हाळी कांदा काढणीला येण्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात थोडा पाऊस झाला. या पावसाने उत्पादकांचा मोठा घात केला. पावसाचे पाणी पोंग्यांमध्ये गेल्याने कांद्याची साठवणक्षमता शेतात असतानाच कमी झाली. पुढे त्याचा परिणाम म्हणून हा कांदा चाळींमध्ये जाण्यापूर्वीच खराब व्हायला सुरवात झाली. लॉकडाउनच्या नव्या संकटाची त्यात भर पडली. साठवणक्षमता हरवून बसलेला उन्हाळी कांदा सध्या चाळींमध्ये सडू लागला. बऱ्याच शेतकऱ्यांना या खराब झालेल्या कांद्याला बाजारपेठ दाखविण्याची संधीदेखील मिळाली नाही. चाळीतून काढलेला कांदा खत म्हणून शेतात टाकण्याची वेळ आली. 

गेल्या पंधरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीत बहुतेक ठिकाणी उन्हाळी कांद्याची लागवड झाली. पाडव्याच्या सुमारास या कांद्याचे पाणी तोडावे लागते. पीक काढणीला आले आणि गेल्या पंचवीस व सत्तावीस फेब्रुवारीला बऱ्याच ठिकाणी पंधरा मिलिमीटरपासून ते तीस मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला. कांद्याच्या पोंग्यांमध्ये पाणी शिरले. एकूण उन्हाळी कांद्यापैकी सत्तर टक्के लागवड याच कालावधीत झाली. बाजारपेठेत नेण्यापूर्वीच कांदा खराब होतो आहे. त्यातच यंदा पाऊस लवकर आला. वातावरणात दमटपणा आला. कांदा खराब होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. या पावसानेदेखील उन्हाळी कांद्याचे नुकसान करण्यास हातभार लावला. 

मागील वर्षी उन्हाळी कांद्याला एक ते दीड हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. व्यापाऱ्यांनी रोख पैसे शेतकऱ्यांच्या हातांवर ठेवले आणि बांधावर येऊन कांदा खरेदी केली. चांगला भाव व बांधावर कांदाविक्री झाल्याने उत्पादक खुशीत होते. यंदा पाण्याची शाश्‍वती असल्याने उन्हाळी कांद्याची लागवड वाढली. मात्र, साठवणक्षमता हरवून बसलेल्या कांद्याला यंदा लॉकडाउनचा मोठा फटका बसला. कांदाविक्रीची साखळी तुटली. सध्यादेखील सरासरी पाचशे ते सातशे रुपये क्विंटलच्या पुढे भाव नाही. उत्पादन खर्चाएवढे पैसेदेखील हातात पडणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांचा कांदा चाळींमध्ये खराब झाला, त्यांच्या नुकसानीत दीडपटीने भर पडली. 

उत्तर नगर जिल्ह्यातील उन्हाळी कांदाउत्पादकांचे यंदा फार मोठे नुकसान झाले. मागील वर्षी पावसाळा लांबल्याने ज्या शेतकऱ्यांनी जानेवारीत लागवड केली, त्यांचा कांदा बरा आहे. मात्र, त्यापूर्वी लावलेला सत्तर टक्के कांदा खराब झाला. उसाऐवजी शेतकरी कांदा लावतात. कांद्याचा यंदा वाईट अनुभव आल्याने आता उसाची लागवड वाढेल; मात्र जागतिक पातळीवर साखरउत्पादन वाढणार आहे. 
- मच्छिंद्र टेके पाटील, प्रगतिशील शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com