साईबाबांची शिर्डी अंधारात, वीज कंपनी काम आरामात

सतीश वैजापूरकर
Thursday, 22 October 2020

साईसंस्थानसह लॉज व हॉटेल व्यवसायामुळे येथून विजवितरण कंपनीला सर्वाधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे खास बाब म्हणून कोपरगाव येथून स्वतंत्र व्यवस्था करून शिर्डीसाठी चोवीस तास विजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिर्डी ः साईबाबांची शिर्डी सलग दीड रात्र अंधारात गुडूप झाली. शिर्डीकरांची झोप उडाली. अक्षरशः निर्जळी घडली. पंखे फिरायचे थांबले तशा घामाच्या धारा सुरू झाल्या. असह्य उकाड्याने जिव हैराण झाला.

छतावरच्या पाण्याच्या टाक्‍या कोरड्या, अंघोळीला पाणी राहिले नाही. इन्व्हर्टरने माना टाकल्या. मोबाईलची बॅटरी चार्ज करण्याची पंचाईत. वादळी पावसामुळे विज वाहक तारांवर झाड कोसळले. शहराचा विजपूरवठा सलग तीस तास खंडीत झाला. विजवितरण कंपनीला सर्वाधिक उत्पन्न देणा-या साईबाबांच्या शिर्डीची हि अशी दैना झाली. 

साईसंस्थानसह लॉज व हॉटेल व्यवसायामुळे येथून विजवितरण कंपनीला सर्वाधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे खास बाब म्हणून कोपरगाव येथून स्वतंत्र व्यवस्था करून शिर्डीसाठी चोवीस तास विजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र 33 के.व्ही.च्या दाबाने येणा-या विजवाहक तारांवर परवा (ता.20) सायंकाळी सहाच्या सुमारास वादळामुळे निमगाव परिसरात झाडाची मोठी फांदी मोडून पडली. त्यामुळे विजेचे पाच सहा खांब वाकले. शहराचा विजपूरवठा खंडीत झाला. 

त्या रात्री पाऊस सुरू होता. सर्वत्र पाणी साठलेले होते. त्यामुळे दुरूस्तीचे काम करता आले नाही. पहिली रात्र शिर्डीकरांनी अंधारात काढली. घरातील पाणी संपले आणि इन्व्हर्टर देखील डिस्चार्ज झाले. दुसरा संपूर्ण दिवस शहराला निर्जळी घडली. अंघोळीला देखील पाणी शिल्लक राहीले नाही. अत्यावश्‍यक वापरासाठी पाण्याचे जार विकत घ्यावे लागले. 

काल रात्री बारा वाजेपर्यत संपूर्ण शहर पाणी आणि विजेवाचून हैराण झाले होते. मध्यरात्री नंतर शहरात विज आली, पून्हा लखलखाट झाला, पंखे फिरायला लागले. दुस-या सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यत नळाला पाणी देखील आले. तिस तासाच्या कालखंडानंतर अंघोळ करण्याचा आनंद रहिवाशांना घेता आला. 

साई दर्शनासाठी अति महत्वाच्या व्यक्ती येथे येतात. त्यामुळे शिर्डीसाठी आणिबाणीच्या प्रसंगी पूर्वी बाभळेश्वर येथून विजपुरवठा सुरू ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परवाच्या अडचणीच्या प्रसंगी मात्र हि पर्यायी व्यवस्था कामी आली नाही. कारण पावसामुळे हि व्यवस्था देखील निकामी झाली आहे. 

सहाय्यक अभियंता वीजवितरण कंपनी दुर्गेश जगताप म्हणाले, वादळी वा-यामुळे कट पॉइंट असलेला महत्वाचा पोल कोसळला. त्यापाठोपाठ पुढे पाच ते सहा पोल वाकले.

सलग बारा तास दुरूस्तीचे काम करूनही अडचण दुर होईना. शेवटी निमगाव येथून शिर्डी शहरासाठी विजपूरवठा सुरू केला. पुढील दोन ते तिन दिवसात शहराचा विजपुरवठा सुरळीत ठेऊन या संपूर्ण विज वाहक मार्गीवरील दुरूस्तीचे काम पूर्ण केले जाईल. 
अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sai Baba's Shirdi in the dark the power company working comfortably