esakal | शिर्डीतील साई मंदिर भाविकांसाठी खुले
sakal

बोलून बातमी शोधा

Sai Mandir opens on the eve of Diwali Padva

साईसमाधी मंदिर पाडव्याच्या मुहूर्तावर भल्या पहाटे दर्शनासाठी खुले झाले.

शिर्डीतील साई मंदिर भाविकांसाठी खुले

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी (अहमदनगर) :

साईसमाधी मंदिर पाडव्याच्या मुहूर्तावर सोमवारी भल्या पहाटे दर्शनासाठी खुले झाले. भाविकांना साईदर्शनाची, तर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना भाविकांच्या गर्दीची आस लागली होती. नगरपंचायतीने विद्युत रोषणाई करून आणि ग्रामस्थांनी रांगोळ्या रेखाटून भाविकांचे स्वागत केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिर उघडण्याचे जाहीर केल्यापासून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यापार्श्वभूमीवर व्यवस्थापनाकडूनही तयारी करण्यात आली होती. 
शिर्डीत येण्यासाठी नगर-कोपरगाव रस्त्याशिवाय पर्याय नाही. पाया खचल्याने हा रस्ता ठिकठिकाणी नष्ट झाला. त्यावर मुरूम टाकला. जड वाहनांनी त्याची भुकटी केली. आता त्यावरून वाहन गेले की धुळीचे लोट उठतात. देश-विदेशातील भाविकांना धूळस्नान करतात. आणखी दोन-अडीच महिने हीच परिस्थिती राहील. बांधकाम विभागाचे स्वागतफलकही धुळीत न्हाऊन निघत आहेत. 
रस्त्यावरून चोवीस तास धुळीचे फवारे उडत असतानाही मोठी गैरसोय सोसून वाहतूक पोलिस वाहने अडवून कागदपत्रे तपासतात. आता भाविकांच्या वाहनांची त्यात भर पडेल. काम दुप्पट वाढेल. या जादा कामाचा बोजा सोसण्यास ते आनंदाने तयार झाले आहेत. त्यांनी नगर ते कोपरगाव या अंतरात किमान तीन ठिकाणी ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. नाशिक पोलिसांनी गुजरात व मुंबई येथून येणाऱ्या भाविकांसाठी नेहमीची सेवा द्यायचे ठरविले आहे. भाविकांच्या स्वागतासाठी अशी सगळ्यांचीच "जय्यत तयारी' झाली आहे. 
नगरपंचायतीला वाहनतळांची सुलभ व्यवस्था आजवर करता आली नाही, तरी रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांना भाडे आकारले जायचे. ही पद्धत लगेच सुरू करण्याबाबत निर्णय झालेला नाही. भविष्यात आरामबस सुरू झाल्या आणि वाहतुकीचा खोळंबा झाला, तर साईसंस्थानने दिलेल्या क्रेनने भाविकांची छोटी वाहने ओढून न्यायची. आरामबसकडे कानाडोळा करायचा, ही पद्धत पोलिस सुरू ठेवणार का, हेही ठरलेले नाही. तूर्त विद्युत रोषणाई करून नगरपंचायतीने भाविकांचे स्वागत केले आहे. 

साईसंस्थानचे अधिकारी साईमंदिर उघडल्यानंतर काय करायचे, याची पूर्वतयारी गेल्या आठ महिन्यांपासून केली. त्यासाठी रोज बैठका झाल्या. या काळात अन्य कुठलेही काम करण्यात शक्ती खर्च न केल्याने, बैठकांवर भर देणे शक्‍य झाले. आजवर चार मुख्य कार्यकारी अधिकारी बदलले. प्रत्येकाने आपआपल्या परीने नियोजन बैठकांची भर घातली. बगाटे यांनी दर्शनार्थींच्या अटी-शर्तीबाबतची माहिती देताना मास्क अनिवार्य असल्याचे सांगितले. मात्र, त्याच वेळी आपण सुरक्षित अंतरावर असल्याने मास्क न घालता, ही माहिती देत असल्याचेही आवर्जुन नमूद केले. 
देशभरातील भाविक आज दिवसभर साईसंस्थानकडे ऑनलाइन बुकींग सुविधा का सुरू केली नाही, याची विचारणा करीत होते. गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेले नियोजन असे शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होते. 

देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना सुलभ साईदर्शन मिळावे, यासाठी साईसंस्थानने तयारी केली आहे. खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे आदींच्या उपस्थितीत काल बैठक झाली. ग्रामस्थ व नगरपंचायत भाविकांचे स्वागत करणार आहे, असे आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

ग्रामस्थांतर्फे भाविकांचे स्वागत केले जाईल. त्यांना त्रास होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाईल. साईमंदिर खुले होणार असल्याने शिर्डीत चैतन्य पसरले आहे. 
- कैलास कोते, माजी नगराध्यक्ष, शिर्डी 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top