
औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे, ही जनतेची मागणी आहे. ते अपेक्षितच आहे. या बाबत आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील.
अहमदनगर ः नववर्ष नवा राजकीय वाद घेऊन येत आहे. सध्या औरंगाबादच्या नामकरणाचा विषय गाजत आहे. या वादात शिवसेनेच्या शिर्डीतील खासदारांनी उडी घेतली आहे. अहमदनगरच्या नामकरणाबाबतही त्यांनी भाष्य केले आहे.
औरंगाबादप्रमाणेच अहमदनगरचेही नामांतर व्हावे. अहमदनगरचे नाव आंबिकानगर करावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
औरंगाबादमध्ये शहराच्या नामकरणावरून सध्या राजकीय वाद सुरू आहे. नामकरणाबाबत कॉंग्रेसचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच वादग्रस्त वक्तव्य केले. विरोधकांनी शहराची नावे बदलण्याची मागणी करण्यापेक्षा विकासाकडे पहावे, असे ते म्हणाले होते. तोच धागा पकडून शिवसेनेचे खासदार लोखंडे यांनी नगरबाबतही वक्तव्य करून नवीन वादाची ठिणगी टाकली आहे.
ते म्हणाले, की औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे, ही जनतेची मागणी आहे. ते अपेक्षितच आहे. या बाबत आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. परंतु औरंगाबादबरोबरच अहमदनगरचेही नामकरण करून "आंबिकानगर' असे व्हावे, अशी आमची मागणी आहे.