पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत संगमनेर शिक्षण विभाग जिल्ह्यात प्रथम

आनंद गायकवाड
Friday, 20 November 2020

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी 2020 घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच घोषित करण्यात आली.

संगमनेर (अहमदनगर) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी 2020 घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच घोषित करण्यात आली. संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातून 40 व शहरी भागातून 32 अशा एकूण 72 विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत समावेश झाला आहे. 

यातील राष्ट्रीय ग्रामीण यादीमध्ये दिक्षा रामदास पवार तर राज्य यादीत आर्या सुनील नवले व हरिष विनायक गडाख या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील निकालात एकूण पात्र विद्यार्थ्यांमध्ये संगमनेर शिक्षण विभाग जिल्ह्यात अव्वल ठरला होता. तालुक्यातील आठ शाळा शिष्यवृत्ती परीक्षेत शंभर टक्के निकालाच्या मानकरी ठरल्या आहेत.

दोन वर्षांपासून गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले होते. या यशाने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच जवाहर नवोदय परीक्षेत तालुक्यातील आठ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यात जिल्हा परिषद शाळांचे सहा विद्यार्थी होते. यातील पाच विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या अतिशय दुर्बल कुटुंबातील आहेत. पंचायत समिती शिक्षण विभागाचे हे मोठे यश आहे. जिल्हा कर्मचारी सांस्कृतिक स्पर्धेमध्ये तालुक्यातील रणरागिनी ग्रुपच्यावतीने सादर झालेल्या व साईलता सामलेटी यांचा सहभाग असलेल्या कब तक मरेगी निर्भया या नाटिकेने द्वितीय क्रमांक मिळवला होता.

संगमनेर पंचायत समिती शिक्षण विभागाने सर्वच क्षेत्रात मिळविलेल्या सर्वांगिण यशाबद्दल राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात, मिलिंद कानवडे, मिरा शेटे, सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. 

दोन वर्षापासून सर्व शिक्षकांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. अनिल कडलग, विलास शिरोळे, अशोक शेटे, दिलीप बेलोटे, संगीता पाटोळे व सुशिला धुमाळ या शिक्षकांचे शिष्यवृत्तीसाठीचे प्रयत्न तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शांताराम अहिरे यांच्या दोन कार्यशाळेतील मार्गदर्शन, शिक्षण विस्तार आधिकारी सुवर्णा फटांगरे यांची साथ, जिल्हास्तरावरून झालेल्या सराव परीक्षा, स्कॉलर मुलांची जिल्हास्तरीय कार्यशाळा, सर्व सहकारी पर्यवेक्षक यंत्रणा व पदाधिकारी यांचा पाठींबा यामुळे हे यश प्राप्त झाले. 
- साईलता सामलेटी, गटशिक्षणाधिकारी

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangamner Education Department first in the district in Primary Scholarship Examination