esakal | गाय म्हणजे मायचं! तिला विष का पाजलं!
sakal

बोलून बातमी शोधा

गाय म्हणजे मायचं! तिला विष का पाजलं!

गाय म्हणजे मायचं! तिला विष का पाजलं!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

‘हा विळा कसा, गवत कापी असा, हे गवत कसे गाय खायी असे’, ‘गायी पाण्यावर काय म्हणूनी आल्या, का गं गंगा यमुनाही मिळाल्या,’ असेल किंवा ‘ लिम्बोनिच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई,’ अशी जुनी गाणी. ती नवी पिढीही गुणगुणत असते. ग्रामीण भागाचा, गावाचा, खेड्याचा विचार केला तर शिवारमाती, घरासमोर असलेले गायी-म्हशीचे गोठे, खिलारी बैलांच्या जोड्या, कालवडी, रेडकू, शेळी हे प्राणी शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटकच. गाय-बैलांवरून शेकडो गाणी निघाली. बैलगाडीत बसून गाणं म्हणणारे दिवंगत अभिनेते अरुण सरनाईक असतील किंवा ‘जीवा-शिवाची बैलजोड’ हे गाणं असेल. ते कधी विसरता येतं का !

बहुसंख्य शेतकऱ्यांच्या घरासमोर गाय ही असतेच. मुलंबाळं आईच्या आणि गायीच्या दुधावरच मोठी होतात. बाळसं धरतात. गायच नव्हे तर म्हैस, बैल, शेळी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. शेतीत राबणाऱ्या हातांना दूधदुभत्याचीच ऊर्जा मिळत असते. घरासमोरील गोठा पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसते, त्याचं वर्णन तरी कसं करावं.

मात्र जिवापाड जपलेल्या गायींनाच जर मालकच विष घालून मारत असेल, राग मुक्या जनावरावर काढत असेल, तर अशा शेतकऱ्याचा कोणत्या शब्दांत समाचार घ्यावा, हे कळत नाही. दोन दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारात दोन गायींना सरकी पेंडेत किटकनाशकं मिसळून खायला घातलं. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ज्याने हे कृत्य केले त्या ज्ञानेश्वर गुंजाळ यांच्याविरोधात पत्नी इंदूबाई गुंजाळ यांनी फिर्याद दिली आहे. गुंजाळ कुटुंबाचा उदरनिर्वाहच दोन गायींच्या दुधावर सुरू होता. जी गाय अन्न देते, जगवते याचंही भान कसं राहिलं नाही. बरं राग काढायचा तर असा काढायचा का ? शेतकरीच जर आपल्या गायीला म्हणजे आईला विष पाजायला लागला तर यापेक्षा दुर्दैव तरी काय असू शकते!

गायीला विष पाजल्याचं वृत्त कानापर पडताच मलाही हरण्या बैल आणि लक्ष्मी म्हैस आठवली. हरण्याला चुलत्यानं चांगलं पैसे देऊन आणला. जेव्हा त्याला घेतलं तेव्हा खोंड होता. त्यानंतर तो काही वर्षे राहिला. पुढे थकला. एकेदिवशी त्यानं जगाचा निरोप घेतला. हरण्या गेल्यानं सगळं घर दुखाच्या खाईत बुडालं होतं. त्याचा चेहरा काही डोळ्यासमोरून जात नव्हता. आज या घटनेला काही वर्षे लोटली. पण तो आठवत नाही असं होत नाही. हरण्याप्रमाणेच गंगू चुलतीनेही लक्ष्मी म्हशीवर असंच जिवापाड प्रेम केलं. हरण्या असेल किंवा लक्ष्मी असेल, त्यांना निरोप देताना त्यांना हळदी-कुंकू लावणं, ओवाळणं, घासमुटका त्यांच्याजवळ चुलत्यामालत्या ठेवायच्या. डोळे पाणवायचे.

हे सगळं आज आठवलं की वाटतं शेतकरी घाम गाळतो, कष्ट करतो, मोती पिकवितो. सुखासमाधानाचं दिवस येऊ दे, अशी देवाकडं प्रार्थना करतो. सगळ्या सणावारांना गोठ्यातील जनावरांना स्वच्छ अंघोळ घालतो. गावगाड्यात आजही हेच सुरू आहे. कितीही प्रगती झाली तरी गायी, बैल, म्हशी, शेळी, कोंबड्या, घराची राखण करायला कुत्रं लागतंच. आचार्य विनोबा भावे यांनी म्हटलं होतं की सापाला मारू नका. तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. प्राण्यांवर दया करा. पण, हे कोण लक्षात घेतं.

मुक्या प्राण्याला आणि आपल्या बाळांना काही कळंत का हो! त्यांना मारा, झोडा, विष पाजा. ते काय करू शकतात. तुम्ही जे कराल ते त्याला सहन करावं लागतं. ज्यांना कळतं. वयानुसार अक्कल येते. तरीही निचपणाने कसं काय वागू शकतो. दावणीच्या गायीला विष खायला घालताना मन इतकं कठोर कसं बनलं असेल. गाय ही आपली माय आहे हे त्याच्या लक्षात का आलं नाही. विषामुळे गायी जेव्हा तडफडल्या असतील, शेवटचा श्वास घेतला असेल, तेव्हा त्यांना आपली मालकीण आठवली असेल का! आजपासून घरातील मुलाबाळांना दूध मिळणार नाही. डेअरीचे पैसे मिळणार नाहीत. चरितार्थ कसा चालवायचा, असे अनेक प्रश्न त्या माऊलीला भेडसावत असतील का! असे एक ना अनेक प्रश्न माझीया मनाला का कोण जाणे पण स्पर्श करून गेले.

loading image
go to top