ब्रिटिशांनी बांधलेला पूल वापरताहेत संगमनेरकर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

1919 साली हे बांधकाम पूर्ण झाले. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने उजवा व डावा कालवा निर्माण केला गेला. त्यातून श्रीरामपूर, राहाता, राहुरी व नेवासे तालुक्याला सिंचन, पिण्याचे पाणी व औद्योगिक कारणासाठी उपलब्ध करुन दिले आहे.

संगमनेर ः संगमनेर तालुक्यातील ओझर येथील बंधाऱ्यातून पूर्वेला तब्बल 77 किलोमिटर लांबीच्या प्रवरा डाव्या कालव्यावरील ओझर, उंबरी बाळापूर, आश्वी बुद्रूक व प्रतापपूर येथील ब्रिटीश काळातील भक्कम दगडी पुलांच्या कामाला शंभर वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला असून, हे पुल वाहतुकीला धोकादायक ठरत आहेत. 

अमृतवाहिनी प्रवरा नदीवर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाच्या निर्मीतीपूर्वी नगर जिल्ह्यात वारंवार पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी, संगमनेर तालुक्यातील ओझर येथे 1873 साली उन्नयी ( उंचावरील ) बंधाऱ्याच्या कामास सुरवात केली होती.

1919 साली हे बांधकाम पूर्ण झाले. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने उजवा व डावा कालवा निर्माण केला गेला. त्यातून श्रीरामपूर, राहाता, राहुरी व नेवासे तालुक्याला सिंचन, पिण्याचे पाणी व औद्योगिक कारणासाठी उपलब्ध करुन दिले आहे.

प्रवरा डावा कालवा सुमारे 77 किलोमिटर लांबीचा आहे. या कालव्यावर दळणवळणाच्या दृष्टीने 1915 च्या सुमारास भक्कम दगडी पुल बांधण्यात आले आहेत. ओझर, उंबरीबाळापूर आश्वी बुद्रूक गावातून मांचीकडे जाणारा रस्ता व प्रतापपूर येथे तीन कमानीचे भक्कम कालव्यांवर बांधण्यात आले होते. हे चारही पुल कोल्हार घोटी राज्यमार्गाला जोडणाऱ्या महत्वाच्या उपरस्त्यांवर आहेत. यावरुन दुचाकी, चारचाकी वाहनांसह उसाचे ट्रॅक्टर, मालट्रक, वाळू, खडी, डबर, खते, पशुखाद्य, विटा आदींच्या वाहतुकीची अवजड वाहने व संगमनेर आगाराच्या एसटी बसही धावतात.

या पुलांच्या दुरुस्तीसाठी पंचायत समितीचे माजी विरोधीपक्ष नेते सरुनाथ उंबरकर यांनी तत्कालिन पाटबंधारे मंत्री अजीत पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीनुसार या पुलांचे सर्वेक्षण करुन, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून 32 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. कालव्याच्या आवर्तन काळात कमकुवत झालेल्या या पुलाबाबत दुर्घटना झाल्यास, किमान महिनाभर या मार्गावरील वाहतूक ठप्प होईल. 

 

1998- 99 मध्य़े गोदावरी खोऱ्याची निर्मीती झाली. या भाग त्या अंतर्गत आहे. मात्र यातील सर्व निधी अधीक महत्वाचे असलेल्या निळवंडे धरण व कालव्यांच्या कामासाठी वापरला गेला. त्यामुळे निधीअभावी इतर कामे प्रलंबित राहीली आहेत.

- सरुनाथ उंबरकर, सामाजिक कार्यकर्ते 
 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangamnerkar is using the bridge built by the British