नगर तालुका ः गावचा प्रमुख हा त्या ग्रामपंचायतीचा प्रथम नागरिक असतो. त्याच्या जबाबदाऱ्याही तेवढ्याच. सिनेअभिनेता (स्व.) निळू फुले यांनी चित्रपटातून रंगवलेला गावचा सरपंच आणि आजच्या परिस्थितीतील सरपंच यात खूप फरक आहे. लॉकडाउनच्या काळात गावातील सरपंचांना मोठ्या प्रमाणावर कसरती कराव्या लागतात.
तीन महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाच्या विषाणूमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही याचा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. गावगाडा चालविताना याची सर्वस्वी जबाबदारी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर आहे.
गावात रेशनवाटपापासून पाणी, आरोग्य, स्वच्छता, दिवाबत्ती याबरोबरच कोरोनासारख्या विषाणूशी गावपातळीवर लढण्यासाठी अगदी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
बाहेरगावी स्थायिक झालेले ग्रामस्थ सध्या आपल्या बिऱ्हाडासह गावाकडे येत आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवणे, त्यांच्या संसारासह गावाबाहेर त्यांच्या निवाऱ्याची सर्व व्यवस्था करणे, त्यांच्या आप्तेष्टांवर लक्ष ठेवणे, त्यांना भेटणाऱ्या ग्रामस्थांवर लक्ष ठेवणे, स्थानिक शासकीय डॉक्टरांना याबाबत माहिती देणे, गावात आलेल्या मोफत रेशनचे व्यवस्थित वाटप करणे, तसेच बालवाडी, अंगणवाडीत आलेल्या पोषणआहाराचे व्यवस्थित वाटप करून त्याची ग्रामपंचायत पातळीवर नोंद ठेवणे, जनधन, श्रावणबाळ योजना, किसान योजना यांच्या वाटपावर बारकाईने लक्ष ठेवणे अशी अनेक कामे सरपंचांना करावी लागतात.
अतिरिक्त कामामुळे गावपातळीवर सरपंच, उपसरपंच वैतागले आहेत. याबरोबरच ग्रामविकास अधिकारी, आरोग्यसेवक, शिक्षक, तलाठी, कृषी सहायक हे नोकरीच्या गावी राहत नसल्यानेही गावकारभाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
त्यामुळे गावपातळीवरील स्थानिक कामगारांना प्राधान्य देत ग्रामस्थांच्या सेवेत सदैव तत्पर असलेल्या सरपंचांची चांगलीच तारांबळ होत आहे.
...........
सध्या कोरोनामुळे सर्वत्र बंद पाळला जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर ग्रामस्थांच्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक नोंदी ठेवाव्या लागतात. तसेच नवीन गावात कोणी येत असल्यास त्यांनाही क्वारंटाईन करून ठेवणे, तसेच त्यांची काळजी घ्यावी लागते.
- मच्छिंद्र कराळे, सरपंच, आगडगाव
|