Satyajeet Tambe : क्षितिजापलिकडे झेप घेण्याची जिद्द असावी; सत्यजित तांबे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satyajit Tambe Twitter Have courage to leap beyond horizon Social media

Satyajeet Tambe : क्षितिजापलिकडे झेप घेण्याची जिद्द असावी; सत्यजित तांबे

संगमनेर : ‘उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी… नजरेत सदा नवी दिशा असावी… घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही… क्षितिजापलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी…’ असे ट्विट आज (मंगळवारी) आमदार सत्यजित तांबे यांनी केले. आज दिवसभर सोशल मीडियावर तांबे यांच्या मनाच्या पाखराला नक्की कोणती दिशा व क्षितिजाचे वेध लागले आहेत, याची चर्चा सोशल मीडियात सुरू होती.

मी अपक्ष म्हणून निवडून आलो असून, अजून काँग्रेस पक्ष सोडला नसल्याची भूमिका आमदार तांबे यांनी मांडली होती. सोमवारी (ता.१३) रात्री मामा आमदार बाळासाहेब थोरात यांनीही सर्व काही व्यवस्थित होईल, असा संकेत दिला होता. त्यानंतर आज आमदार तांबे यांनी केलेल्या ट्विटने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आजारी असल्याने रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्या अनुपस्थितीत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. तांबे यांच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील विजयाला पक्षांतर्गत वादाची किनार लाभल्याने, अनेक वावटळींचा सामना तांबे पिता-पुत्रांना करावा लागला.

याच कारणामुळे त्यांच्यावर काँग्रेस पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली. आपल्या विजयानंतर तांबे यांनीही हा विजय काँग्रेसकडून झाला असता, तर अधिक आनंद झाला असता, असे शल्य व्यक्त केले होते. दरम्यानच्या काळात भाजपातील दिग्गजांनी त्यांना भाजपात येण्याची ऑफर दिल्यानंतरही, तांबे यांनी आपण अपक्ष म्हणूनच काम करणार असल्याचे ठामपणे सांगितले होते.

तब्बल दीड महिन्यानंतर संगमनेरला येणारे आमदार थोरात यांच्या स्वागतासाठी सोमवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात मामा-भाचे सोबत होते. या वेळी बोलताना सत्यजितच्या बाबतीत झालेला तांत्रिक घोटाळा मी असतो, तर झालाच नसता, असे सांगत, सत्यजितला काँग्रेसशिवाय आणि आम्हालाही त्याच्याशिवाय करमणार नसल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. या वक्तव्याला बारा तास उलटताच आज आमदार तांबे यांनी ट्विट केल्याने आज दिवसभर विविध सोशल माध्यमावर याच ट्विटची चर्चा सुरु होती.