जनजीवन सुरळीत होत असतानाच स्कुलबस, रिक्षा चालकांसमोर बेरोजगारीचे संकट

गौरव साळुंके
Saturday, 8 August 2020

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने स्कुलबस, शालेय रिक्षाची चाके रुतली आहेत.

श्रीरामपूर (अहमदनगर) : कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने स्कुलबस, शालेय रिक्षाची चाके रुतली आहेत. शाळा सुरु होण्याबाबत संभ्रम असल्याने स्कुलबससह शालेय रिक्षाचालकांची इतर काम शोधण्याची धडपड सुरु आहे. लॉकडाउन शिथीलतेनंतर जनजीवन सुरळीत होत असले तरी काम मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत असल्याचे स्कुलबस चालक निलेश ठोंबरे यांनी सांगितले.

कोरोनामुळे वाहन चालकांवर खुप वाईट दिवस आले असुन 20 वर्षापासुन रिक्षा चालवुन विद्यार्थांची सेवा करतो. शाळा,  महाविद्यालये बंद असल्याने रिक्षा घरासमोर उभ्या आहेत. त्यामुळे कर्जाचे हप्ते थकले आहे. घरात चार मुले असुन उपासमारी होत असल्याने त्यांना जालना येथील नातेवाईकांकडे सोडल्याचे ठोंबरे यांनी संगितले. 

रोज कामाच्या शोधात घराबाहेर पडतो. परंतू काम मिळत नसल्याने रिकाम्या हाताने घरी परतावे लागते. लॉकडाऊन शिथिलतेनंतर सर्व व्यवहार सुरळीत होत आहे. परंतू प्रवासी वाहतुक अद्याप विस्कळीत आहे. वाहतुकीसाठी परवानगी मिळत नसल्याने प्रवांशीही भितीच्या छायेत आहे. कोरोनामुळे रिक्षात कुणी बसत नाही. त्यात पोलिसांची धास्ती नियमित पाऊती फाडावी लागते. सध्या काम मिळत नसल्याने पेट्रोल टाकण्यासाठी तसेच चहा पिण्यासाठी खिशात पैसे नसतात. कोरोनामुळे सर्वच आर्थिक अडचणीत सापडले असुन हातउसने पैशा मागणे मुश्किल झाले आहे. काही स्कुलबस व रिक्षाचालक सध्या भाजीपाला, फळेविक्रीसह मोलमंजुरी करुन कुटूंबाचा सांभाळ करत असल्याचे शालेय रिक्षाचालक सचिन कुटे यांनी सांगितले. 

शाळा बंद असल्याने कामाच्या शोधात वणवण करण्याची वेळ स्कुलबस व रिक्षा चालकांवर आली आहे. अनेकांनी इतर लहान-मोठे व्यवसाय सुरु केले. तर काहीनी गावाकडे जावुन शेती करण्यास पसंती दिली. त्यात सदोष बियाण्यामुळे यंदा सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागल्याने आर्थिक ताण वाढला असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School bus and rickshaw driver become unemployed in Shrirampur taluka