मोरया चिंचोरेच्या वृक्षराजींमध्ये भरली फुलपाखरांची शाळा, जैवविविधताही जपली

सुनील गर्जे
Monday, 26 October 2020

पावसाने जूनच्या पहिल्याच दिवसापासून सर्वत्र बरसायला सुरवात केली. सततच्या पावसाने मोरया चिंचोरे येथील डोंगर, जंगले, माळरान परिसरातील विविध वनस्पती आणि रानफुले बहरली आहेत.

नेवासे : दिवसेंदिवस जंगलतोड केली जात आहे. नवीन जंगल उभारण्यासाठी केवळ भाषणे केली जातात. मात्र, नेवाशाच्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने मोरया चिंचोरेत केलेल्या कामांमुळे जैवविविधता जपली जात आहे. वन्यप्राण्यांसोबतच फुलपाखरांचाही तेथे वावर वाढला आहे.

पावसाने मृग नक्षत्राच्या प्रारंभापासून आतापर्यंत जोरदार हजेरी लावल्याने पीक हातचं गेल्याने बळीराजा हैराण झाला. दुसरीकडे, डोंगर, जंगलासह माळरानावर हिरवे गालिचे पसरल्याचे चित्र आहे.

या हिरव्या गालिचावर रंगीबेरंगी फुलपाखरे मुक्तपणे स्वच्छंद विहार करीत आहेत. युवा नेते प्रशांत पाटील गडाख अध्यक्ष असलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाने दत्तक घेतले. अल्पावधीतच पर्यटकांचे आकर्षण ठरलेले आदर्शगाव मोरया चिंचोरे (ता. नेवासे) येथील जंगल परिसरातही हे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे.

मोरया चिंचोरे येथील सुपाता व मानबाई डोंगर व जंगल परिसरातील वनराईने हिरवा शालू परिधान केलेला हा निसर्गरम्य परिसर व येथे मूक्तसंचार करणारे वन्य पशू पर्यटकांना भूरळ घालतातच; मात्र या जंगलाच्या सौंदर्यात आणखी भर घातली, ती मुक्तपणे स्वच्छंद विहार करणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखरांनी. 

पावसाने जूनच्या पहिल्याच दिवसापासून सर्वत्र बरसायला सुरवात केली. सततच्या पावसाने मोरया चिंचोरे येथील डोंगर, जंगले, माळरान परिसरातील विविध वनस्पती आणि रानफुले बहरली आहेत. या परिसरात व रानफुलांवर 40 ते 45 प्रजातींचे रंगीबेरंगी फुलपाखरांचे थवे दिसत आहेत. त्यामुळे या परिसरात वेगळाच बहर आल्याचे चित्र दिसत आहे. वेगवेगळ्या रंगांची ही तुरूतुरू उडणारी फुलपाखरे मात्र सर्वच पर्यटकांचे विशेषत: बालगोपाळांचे लक्ष वेधून घेत आहेत. 

आढळणाऱ्या प्रजाती 
मोरया चिंचोरे येथील जंगलात आढणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजाती : ग्रास यलो, मॉंटल्ड इमिग्रंट, प्लेन टायगर, ब्लू पॅन्सी, ब्लू टायगर, लेमन पॅनसी, ग्रास ज्वेल, कॉमन फॉर रिंग, पायोनियर, राईस स्वीफ्ट, डेनाइड एगफ्लाय, कॉमन रोझ, कॉमन मॉरमॉन, कॉमन क्रो, क्रीमसन रोझ, ऑरेंज टीप, इव्हिनिंग ब्राऊन, कॉमन लेपर्ड, सिल्व्हर लाईन. 

सामान्यपणे फुलपाखरांसह इतर अनेक कीटक आपले जीवनचक्र वर्षातून एकदा पावसाळ्यात पूर्ण करीत असतात. यंदा मोसमी व परतीच्या सततच्या पावसाच्या कृपेमुळे फुलपाखरांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. त्यांच्यातील प्रजनन जोमाने चालले आहे. त्यामुळे ते क्रियाशील बनले आहेत व त्यांचा वावरही वाढला आहे. 
- प्रा. योगेश जाधव, पर्यावरण अभ्यासक, सोनई 

मोरया चिंचोरे येथील निसर्गरम्य डोंगर, जंगल परिसर येथील मुक्तसंचार करणारे वन्य पशू-पक्षी, बागडणारे फुलपाखरे, वाहणारे लहान-मोठे धबधबे, पाण्याने तुडुंब भरलेले तलाव व बंधारे, हिरवाईने नटलेली वनराई, येथील शांत व आल्हाददायक वातावरण मन प्रसन्न करणारे आहे. 
- आदित्य दहिवाळ, पर्यटक, औरंगाबाद 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A school of butterflies in the trees of More Chinchore