
दुष्काळी भागातील अनेक शेतकर्यांसह अनेकांनी कुटुंबियांसह पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडीला पसंती दिली आहे. त्यामुळे अनेक ऊसतोड मजूर कुटुंबे शाळेत जाणार्या मुलांना सोबत घेऊन ऊसतोड करत आहेत.
नेवासे : साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्याने ऊसतोडीसाठी बहुतांश मजुरांनी स्थलांतर केले आहे. मात्र ऊसतोड मजुरांची मुले शाळांनी चालू असलेले ऑनलाईन शिक्षण सोडून पालकांसोबत उसाच्या फडात राबतानाचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.
कोरोना संसर्गामुळे शाळा बंदच होत्या. दरम्यान शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून महाविकास आघाडी सरकारने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू केले. त्यानंतर परिस्थितीत थोडू सुधारणा झाल्यावर नववी ते बारावी वर्ग सुरू केले. मात्र, पहिली ते आठवी वर्गांचे अद्यापही ऑनलाईन शिकविणे चालू असले तरी ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणाकडे पाठ फिरवून त्यांच्या पालकांना उसतोडीसाठी मदत करतांना अनेक उसाच्या फडात काम करतांना दिसतात.
दुष्काळी भागातील अनेक शेतकऱ्यांसह अनेकांनी कुटुंबियांसह पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडीला पसंती दिली आहे. त्यामुळे अनेक ऊसतोड मजूर कुटुंबे शाळेत जाणाऱ्या मुलांना सोबत घेऊन ऊसतोड करीत आहेत. ऊसतोडीसाठी पालकच घराबाहेर पडल्यामुळे तसेच यावर्षी कोरोनामुळे शाळा व आश्रम शाळाही बंद असल्याने या मुलांचा गावात कोण सांभाळ करणार, असा प्रश्न पडल्यामुळे अनेक मजुरांनी मुलांना सोबत आणले आहे.
दरम्यान भानसहिवरे शिवारात एक उसाच्या फडात आठवी ते पाचवीतील अनुक्रमे संदीप राठोड, राहुल राठोड, सोनाली जाधव, अविनाश जाधव हे बीड, जालना जिल्ह्यातील ऊसतोड मजूरांची मुले शिक्षण सोडून लहान बहीण-भावंडांचा सांभाळ, उसाच्या फडात पालकांना मदत करतांना निदर्शनास आली. हीच परिस्थिती सर्वत्र आहे.
साखर शाळा सुरू व्हाव्यात..!
ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणाची संधी निर्माण व्हावी, यासाठी कारखाना परिसरात साखरशाळा सुरू करण्याचा निर्णय साखर संचालक व शासनाने घेतला होता. मात्र, गेल्या सात-आठ वर्षांपासून साखर शाळा बंद आहे. त्यापुन्हा सुरू होऊन ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.
"शिकावं वाटत, शिकून पोलीस, फौजी, साहेब व्हाव वाटत, पण वडलांबरोबर ऊसतोडीला याव लागलं, तोडीहुन गावाकडं गेल्यावर शाळेत जाणार आहे.
-राहुल राठोड, इ. सातवी. रा. सुशीतांडा, ता.गेवराई“पोरांचे शिक्षण व्हावं असं वाटत, पण परिस्थितीमुळे पोटासाठी पोरांना घेवून ऊसतोडीसाठी गाव सोडावं लागतं. बंद असलेल्या साखर शाळा पुन्हा सुरू झाल्या तर बरं होईल.
- लहू राठोड, राहुलचे पालक“खरीपातील पेरणी, मुला-मुलींचे लग्न व देणेदाराची देणी देण्यासाठी मुकादमाकडून अनेकांनी घेतलेली उचल फेडण्यासाठी तसेच पोटासाठी शिकणार्या मुलांना घेवून ऊसतोड करावी लागते.
–प्रल्हाद राठोड, ऊसतोडणी मजूर, माटेगाव, ता.बीड