शाळा सज्ज! पालकांमध्ये संभ्रम; नेवासेत शिक्षण विभागाची तयारी पूर्ण

सुनिल गर्जे
Sunday, 22 November 2020

शासनाच्या कोविड-19च्या नियमांचे पालन करीत सोमवारपासून (ता. 23) नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत.

नेवासे (अहमदनगर) : शासनाच्या कोविड-19च्या नियमांचे पालन करीत सोमवारपासून (ता. 23) नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. त्यासाठी शाळांनी मोठी तयारी केली असली, तरी कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने पालकांमध्ये संभ्रम कायम आहे. 

राज्य सरकार व जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाबाबत दिलेल्या आदेशाचे पालन होणे अनिवार्य आहे. मात्र, आरोग्य विभागाने जानेवारी 2021नंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत कसे पाठवावे, असा प्रश्‍न पालकांना पडला आहे. शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी मुलांना शाळेत पाठविणे गरजेचे आहे, असा सूरही काही पालकांमधून उमटत आहे. 

पालक संभ्रमात असताना दुसरीकडे, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गखोल्या सॅनिटाइझ केल्या आहेत. पुन्हा येत्या आठवड्यात वर्गखोल्या सॅनिटाइझ केल्या जातील, असे सोनई येथील शनैश्वर विद्यालयाचे प्राचार्य दिलीप सोनवणे यांनी सांगितले. 

विद्यार्थ्यांना दिवसाआड शाळेत यावे लागेल. शाळेत 50 टक्के, तर घरी ऑनलाइन शिक्षणासाठी 50 टक्के उपस्थिती राहणार आहे. वर्गात एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल. नववी ते बारावीपर्यंत ऑनलाइन- ऑफलाइन शिक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करताना पालकांना सोबत यावे लागेल. 

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोमवारी शाळा सुरू होतील. मुख्याध्यापकांची बैठक घेऊन, तसेच पत्राद्वारे शाळांचे सॅनिटायझेशन, विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत काळजी, स्वच्छता आदींबाबत सूचना केल्या आहेत. 
- शिवाजी कराड, शिक्षण विस्तार अधिकारी, नेवासे 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The school will start from Monday in Newase taluka