
अनेक शाळांमध्ये आजही शुकशुकाट आहे. तालुक्यातील 9 ते 12वी अखेर 87 शाळांमधून 14 हजार 954 विद्यार्थी शिक्षण घेतात.
पारनेर ः तालुक्यातील अनेक शाळांतील शिक्षकांची कोरोना चाचणी झाली. मात्र, चाचणीनंतर आठवडा उलटूनही अनेकांचे अहवाल आलेले नाहीत. शिवाय अनेक पालकांनी संमतीपत्र न दिल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्यच आहे. पालकांची संमती व शिक्षकांचे कोरोना अहवालात शाळांची घंटा वाजलीच नाही.
अनेक शाळांमध्ये आजही शुकशुकाट आहे. तालुक्यातील 9 ते 12वी अखेर 87 शाळांमधून 14 हजार 954 विद्यार्थी शिक्षण घेतात. पैकी आतापर्यंत अवघ्या 26 शाळा सुरू झाल्या आहेत. सध्या फक्त 1167 विद्यार्थी शाळेत येत आहेत.
याचा अर्थ 10 टक्केही उपस्थिती नाही. तालुक्यात नववी ते बारावीपर्यंत 1098 शिक्षक व शिक्षेकेतर कर्माचारी आहेत. या सर्वांची कोरोना चाचणी झाली आहे. मात्र, त्यातील अनेकांचे अहवाल आठवडा होऊनही आलेले नाहीत. काही ठिकाणी अद्यापही पालक कोरोनामुळे धास्तावलेलेच आहेत. त्यामुळे ते संमतीपत्रे देण्यास इच्छूक नाहीत.
शिक्षकांची कोरोना चाचणी अहवाल व पालकांच्या संमतीपत्राची अडचण असल्याने अनेक शाळांमधील घंटा वाजलीच नाही. ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असे शिक्षक शाळेत हजेरी लावत आहेत. मात्र, तालुक्यात आतापर्यंत आठ शिक्षक बाधित निघाले आहेत. त्यामुळे ते शिक्षक कार्यरत असलेल्या शाळा सुरू झालेल्या नाहीत.
शिवाय आठ-आठ दिवस कोरोना चाचणीचा अहवाल येत नसेल, तर हे शिक्षक पुन्हा कोरोना निगेटिव्ह असतील, याची खात्री कोण देणार? त्यामुळे शाळांचा परिसर आजही सुना सुनाच आहे.
..तर संपूर्ण विद्यार्थ्यांची चाचणी
अनेक शाळांमधील शिक्षक व मुलेही वेगवेगळ्या गावांहून येत आहेत. अनेक गावात दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. अद्याप कोरोना संपलेला नाही. पालक व मुलांमध्येही कोरोनाची भीती कायम आहे. त्या मुळे एखाद्या शाळेत शाळा सुरू झाल्यानंतर, शिक्षक बाधित निघाल्यास संपूर्ण शाळेची चाचणी करावी लागणार आहे.
चाचणी झालेल्या शिक्षकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. रोज मुलांशी जवळीक येणार आहे, याची जाणीव ठेवून शाळेत यावे. हळुहळू मुलांची उपस्थिती वाढत जाईल. शिक्षक, मुले व पालकांना थोडे दिवस त्रास सहन करावा लागेल. लवकरच सर्व काही सुरळीत होईल.
- बाळासाहेब बुगे, गटशिक्षणाधिकारी, पारनेर