कृषिमंत्री भुसे यांच्या प्रश्नाने फुले विद्यापीठातील शास्त्रज्ञ निरूत्तर

रहेमान शेख
Monday, 7 December 2020

भुसे यांनी तेथील अधिकाऱ्यांना ही मशीन सुरू करून दाखवा, असे दोन ठिकाणी सांगितले. मात्र, लाखोंच्या मशिनरी सुरूच झाल्या नाहीत.

राहुरी विद्यापीठ : विद्यापीठाने केलेल्या एका संशोधनावर लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावते. मात्र, सध्या अनेक शास्त्रज्ञ कारणे पुढे करीत आहेत. आपल्या संशोधनावर, कार्यपद्धतीवर आपण खूश आहात का? लाखो रुपयांचा शेतमाल वाया जातो, शेतकऱ्यांचे नुकसान होते, यावर आपले काय संशोधन आहे? त्यासाठी विद्यापीठाची यंत्रणा काय करते? कमी किंमतीत छोट्या शेतकऱ्यांच्या गरजांनुसार कृषी अवजारांचे संशोधन केले काय, अशा प्रश्‍नांची सरबत्ती करीत कृषिमंत्री दादा भुसे यांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना निरुत्तर केले. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्र भेटीदरम्यान मंत्री भुसे बोलत होते. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष (उत्तर) रावसाहेब खेवरे, कुलसचिव मोहन वाघ, नियंत्रक विजय कोते, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, सुधाकर बोराळे, मंत्र्यांचे विशेष अधिकारी रफिक नाईकवाडी उपस्थित होते. 

मंत्री भुसे यांनी फॉरेज कॅक्‍टस प्रक्षेत्र, गो-संशोधन प्रकल्प, गांडूळ संशोधन प्रकल्प, पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प, बांबू संशोधन प्रक्षेत्र, कोरडवाहू फळ संशोधन, कृषी अवजारे, काढणी पश्‍चात तंत्रज्ञान आदी प्रकल्पांना भेटी दिल्या. या दरम्यान अनेक सुचना व शेतकऱ्यांच्या अपेक्षा त्यांनी विद्यापीठ अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. 

जैवतंत्रज्ञान प्रकल्पाचे पितळ उघडे 
पुर्वनियोजित नसलेल्या जैवतंत्रज्ञान प्रकल्पास मंत्री भुसे यांनी अचानक भेट देण्याचे सांगितल्याने, या प्रकल्प अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यातून जैवतंत्रज्ञान प्रकल्पाचे सत्य समोर आले. विद्यापीठास मिळालेल्या 100 कोटी रुपयांच्या अनुदानातून कोट्यवधीची मशीनरी घेऊन ठेवली आहे. सुमारे पाच वर्षांपासून अनेक मशिनरी वातानुकूलीत कक्षांत निवांत पडून आहेत.

भुसे यांनी तेथील अधिकाऱ्यांना ही मशीन सुरू करून दाखवा, असे दोन ठिकाणी सांगितले. मात्र, लाखोंच्या मशिनरी सुरूच झाल्या नाहीत. गेल्या 20 वर्षांपासून जैवतंत्रज्ञान प्रकल्पात एकही उल्लेखनिय संशोधन झाले नसल्याची खंत भुसे यांनी व्यक्त केली. 

असा कृषिमंत्री पाहिजे
प्रक्षेत्र भेटीदरम्यान मंत्री भुसे यांनी अचानक ताफा थांबवून ते कॅक्‍टस प्रकल्पात काम करणाऱ्या मजुरांकडे गेले. त्यांची चौकशी केली. आपणांस किती पगार मिळतो? वेळेवर मिळतो का? कामात अडचणी आहेत का? गवत काढताना हातांना काटे तर टोचत नाही का, अशी आपुलकीने चौकशी केली. या वेळी त्यांनी विद्यापीठातील वा ताफ्यातील कोणाही कर्मचाऱ्याला जवळ येऊ दिले नाही. "असा कृषिमंत्री पाहिजे,' अशी भावना एका मजुराने व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scientists at Phule University did not answer the question of Agriculture Minister Bhuse