Pravara River SDRF Boat Accident
Pravara River SDRF Boat Accidentesakal

Akole News : बचाव पथकातील SDRF ची बोट उलटली! चार जण बुडाले

अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथील प्रवरा नदीवरील केटीवेअर बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुधवारी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

अकोले (जि. नगर) - तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथील प्रवरा नदीवरील केटीवेअर बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुधवारी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यातील एकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी आज आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) या पथकाच्या दोन बोटींपैकी एक बोट उलटली. तीमधील सहाजण बुडाले. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. इतर दोघांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये प्रकाश शिंदे (वय ३५), वैभव वाघ (वय ४०), राहुल पावरा (वय २७, तिघे रा. धुळे) यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहे, तर गणेश देशमुख (वय ३७, रा. सुगाव) हा बेपत्ता आहे. परंतु, तो खोल पाण्यात गेला असल्याने त्याचाही मृत्यू झाल्याचे बचाव पथकातील अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

पाण्याबाहेर सुखरूप काढण्यात आलेल्यांमध्ये पंकज पवार (वय ३८) व अशोक पवार (दोघे रा. धुळे) यांचा समावेश आहे. दुसऱ्या बोटीत असलेले मनोज शिंपी व कमलेश महाजन (दोघे रा. धुळे) हे दोघेही जखमी आहेत. सर्वांवर अकोले येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

काल (बुधवारी) दुपारी प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेले सागर जेडगुले (वय २५, ता. सिन्नर) व अर्जुन जेडगुले (वय १८, ता. संगमनेर) यांचा बुडून मृत्यू झाला. त्यातील एकाचा मृतदेह काल सापडला. दुसऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी आज धुळे येथील ‘एसडीआरएफ’च्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकातील बोटही बुडाल्याने आजची दुर्घटना झाली.

बचाव पथक दोन बोटींद्वारे शोधकार्यासाठी पाण्यात शिरले होते. नदीपात्राच्या मध्यभागी गेल्यानंतर तेथे असलेल्या खड्ड्यांमुळे तयार झालेल्या भोवऱ्यात सहाजण असलेली बोट सापडली. त्यामुळे ते सर्वजण बुडू लागले. त्यातील दोघांना वाचविण्यात यश आले.

उजनीतील मृतदेह सापडले

इंदापूर : उजनी धरणात मंगळवारी (ता. २१) प्रवासी वाहतूक करणारी बोट उलटून झालेल्या अपघातामध्ये करमाळा तालुक्यातील कुगाव आणि झरे या गावातील बेपत्ता झालेले सर्व सहा प्रवाशांचे मृतदेह तब्बल ३६ तासानंतर नैसर्गिकरित्या पाण्यावर तरंगत वर आले. मृतदेह ‘एनडीआरएफ’च्या जवानांनी जलाशयातून बाहेर काढत पुढील कार्यवाहीसाठी करमाळा येथे दाखल केले. मृतदेह पाहताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com