esakal | दीपावलीच्या मुहूर्तावर अकोले तालुक्यात बीज बँकेत बियाणांची पूजा
sakal

बोलून बातमी शोधा

Seed worship at Seed Bank in Akole taluka on the occasion of Diwali

दीपावलीनिमित्त धूम धाम व पूजाअर्चा सुरू असताना घरोघरी लक्ष्मीपूजन दीपावलीच्या शुभमुहूर्तावर केले जाते. परंतु जीवापाड जपलेल्या बियाण्यांची पूजा म्हणजेच लक्ष्मीची पूजा या विचारांना स्वीकारत पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी आपल्या बीज बँकेत पतीसह आणि नातवानंसह विधिवत पूजा केली.

दीपावलीच्या मुहूर्तावर अकोले तालुक्यात बीज बँकेत बियाणांची पूजा

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : सर्वत्र दीपावलीनिमित्त धूम धाम व पूजाअर्चा सुरू असताना घरोघरी लक्ष्मीपूजन दीपावलीच्या शुभमुहूर्तावर केले जाते. परंतु जीवापाड जपलेल्या बियाण्यांची पूजा म्हणजेच लक्ष्मीची पूजा या विचारांना स्वीकारत पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी आपल्या बीज बँकेत पतीसह आणि नातवानंसह विधिवत पूजा केली. त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की जिवापाड जपलेले बियाणे हेच शेतकर्‍यांसाठी लक्ष्मीचे रूप आहे व त्याची पूजा आणि संवर्धन केल्यानेच माझा गरीब शेतकरी राजा सुखी होऊ शकतो. 

यानिमित्ताने पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांचे आणखी एक रूप जगासमोर येण्यास मदत झालेली आहे. राहीबाई सोमा पोपेरे यांच्या बँकेत शेकडो प्रकारचे पारंपारिक बियाणे संवर्धित केलेले आहेत. याच बियाण्यांनी त्यांना देश आणि विदेशात प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे.बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या मदतीने त्या दिवस-रात्र बियाणे संवर्धन ,वृद्धी आणि वितरण या विषयासाठी कार्यरत आहेत.

दीपावली सणानिमित्त त्यांनी अगोदर संपूर्ण बीज बँक धुऊन पुसून साफ केली व गावठी गाईच्या शेणाने सारवून घेतल्यानंतर त्यावरती गाडगी, मडकी आणि बांबूच्या कणग्यान मधे ठेवलेले बियाणे त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने ठेवून त्यांची पती सोमा यांचे समवेत विधिवत पूजा केली. विविध रंगांचे बियाणे वापरून तयार केलेला दिवा हे या पूजेचे मुख्य आकर्षण होते .आपल्या बीज बँकेत विविध प्रकारची बियाणे भाताच्या लोंब्या यांची त्यांनी मनोभावे पूजा केली. गावरान व देशी बियाणे यांनाच आपले जीवन मानलेल्या राहीबाई यांनी बियाने संवर्धन हेच आपले अंतिम कार्य असून त्यासाठी आपण समर्पित असल्याचे स्पष्ट केले आहे. 

दिवसभर बियाणे बँकेत स्वच्छता व सडा-रांगोळी करण्यासाठी त्यांना त्यांच्या नातवंडांनी मनापासून मदत केली.चालू खरीप हंगामात नव्याने तयार झालेले विविध प्रकारचे बियाणे ज्यामध्ये दुधी भोपळा, दोडका, वाल, कारली, लाल भोपळा, मिरची टोमॅटो, वांगी, काकडी, खरबूज, भात, नागली, वरई, खुरसनी, भुईमूग, मूग, उडीद, चवळी अशा नानाविध बियाण्यांची पूजा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने केली. 

संपादन : अशोक निंबाळकर

loading image